...आणि पाकिस्तानची एफ-१६ लढाऊ विमानं पळून गेली!

भारतीय वायुदलाच्या हल्ल्याला तोंड देण्याऐवजी पाकिस्तानची एफ १६ विमानं पळून गेली

Updated: Feb 26, 2019, 01:28 PM IST
...आणि पाकिस्तानची एफ-१६ लढाऊ विमानं पळून गेली!  title=

नवी दिल्ली : पाक अधिकृत काश्मीरच्या (PoK) बालाकोडट भागात जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पवर भारतीय वायुसेनेनं हल्ला केला. ही कारवाई आयएएफच्या पश्चिमी कमांडनं केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या ऑपरेशनची भनक पाकिस्तानच्या वायुसेनेला खूपच उशिरा लागली. भारताच्या वायुसेनेकडून बॉम्बवर्षाव केला जातोय हे पाकिस्तान वायुसेनेच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या लढाऊ विमान एफ-१६ नं सुरुवातीला आकाशात झेप घेतली. परंतु, आकारानं मोठ्या असलेल्या भारतीय वायुसेनेच्या विमानांना पाहताच त्यांनी परतीची वाट धरली. भारतीय वायुसेनेच्या विमानांसमोर आपला काही निभाव लागू शकणार नाही, हे त्यांच्या एव्हाना लक्षात आलं होतं. 

पाकिस्तानी 'एफ १६' चा पळपुटेपणा जगासमोर आलाय. हल्ल्याला तोंड देण्याऐवजी पाकिस्तानची एफ १६ विमानं पळून गेली. मिराज विमानांची संख्या पाहूनच पाकिस्तानी विमानांनी शेपूट घातली. भारतीय हल्ल्याला तोंड देण्याऐवजी एफ १६ विमानांनी पळून जाणं पसंत केलं. एरवी पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर देणं वगैरे काय काय वल्गना करत असतं. पण वास्तवात मात्र पाकिस्तानचे सैनिक हे अगदीच पळपुटे असल्याचं उघड झालंय. 

दरम्यान, पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर भारताने चढवलेल्या हल्ल्याच्या वृत्ताला भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने पुष्टी दिलीय. पाकिस्तानच्या भूमीवरील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर भारतीय वायुदलाने पहाटेच्या सुमारास बॉम्ब वर्षाव केलाय. भारतात जैश ए मोहम्मद आणखी दहशतवादी हल्ले चढवण्याच्या तयारीत होतं. त्यामुळे हा हल्ला करून जैशला नेस्तनाबूत करणं भारताला भाग पडलं असं परराष्ट्र खात्याने म्हटलंय. भारतीय वायुसेनेद्वारे मंगळवारी पहाटे ही कारवाई केली. या ऑपरेशन दरम्यान लढाऊ विमान जग्वॉरनं या कारवाईचं रेकॉर्डिंगही केलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेनं लढाऊ विमानांनी लेजर गाइडेड बॉम्बच्या सहाय्यानं हा हवाई हल्ला केला. यामध्ये २००-३०० दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये जैश-ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा सीनिअर कमांडर आणि मसूद अजहरचा मेव्हणा मौलाना युसूफ अजहर हादेखील ठार झाल्याची माहिती परदेश सचिव विजय गोखले यांनी दिलीय. बालाकोटमधला जैशचा सर्वात मोठा दहशतवादी तळ हा मौलाना युसूफ अजहर उर्फ उस्ताद घोरी हा चालवत होता. या हल्ल्यात हा तळ संपूर्ण नष्ट झाला असून यात जैशचे मोठ्या प्रमाणात दहशतवादी, म्होरके, कमांडर्स, ट्रेनर्स ठार झालेत अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिलीय. आपल्या भूमीचा दहशतवाद्यांना वापर करू देऊ नका असं भारताने पाकिस्तानला वारंवार बजावलं होतं.