मोदी सरकारकडून पाच वर्षांत तीनदा सर्जिकल स्ट्राईक

दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे पाकिस्तानातील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ उदध्वस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे एअरस्ट्राईक केला.

Updated: Feb 26, 2019, 01:22 PM IST
मोदी सरकारकडून पाच वर्षांत तीनदा सर्जिकल स्ट्राईक title=

नवी दिल्ली - दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे पाकिस्तानातील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ उदध्वस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे एअरस्ट्राईक केला. यामध्ये जैशचा संपूर्ण तळ बॉम्बच्या साह्याने उडवून देण्यात आला. या हल्ल्यामध्ये अंदाजे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरातून भारतीय सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. पाच वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहशतवाद्यांच्या तळांवर तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. म्यानमारच्या सीमेवर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. त्यानंतर उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. आता पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडून एअर स्ट्राईक करण्यात आला. पाच वर्षांच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे दहशतवाद्यांच्या मनातही मोदी सरकारबद्दल भीती निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

१४ फेब्रुवारीला पुलवामातील अवंतीपोराजवळ जैशच्या एका दहशतवाद्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. त्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक मेजर आणि चार जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. या घटनेनेनंतर संपूर्ण देशभरात दहशतवाद्यांबद्दल चीड निर्माण झाली होती. बरोबर १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोटमधील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्ब फेकले. या हल्ल्यात केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार मारले गेले असल्याचे प्राथमिक माहितीतून पुढे आले आहे. मंगळवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास हे हल्ले करण्यात आले. हवाई दलाच्या ताफ्यातील मिराज विमानांचा त्यासाठी वापर करण्यात आला. 

म्यानमारच्या सीमेवर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक
९ जून २०१५ मध्ये पहिल्यांदा म्यानमारच्या सीमेवरील चंदेल भागात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. ४ जून रोजी कट्टरपंथीय संघटना एनएससीएनने मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यामध्ये १८ जवान शहीद झाले होते. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण ७२ विशेष प्रशिक्षित कमांडोंनी हा सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला होता. म्यानमारच्या सीमेच्या आतमध्ये घुसून सैनिकांनी हल्ला करीत एनएससीएनच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

उरी हल्ल्यानंतर दुसरा सर्जिकल स्ट्राईक
१८ सप्टेंबर २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी उरीतील भारतीय सेनेच्या तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर लगेचच मोदी सरकारने दहशतवाद्यांना याचे सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. त्यानंतर १० दिवसांतच २८ सप्टेंबरच्या रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांना ठार मारून भारतीय लष्कराचे सर्व जवान मायदेशी परतले होते. 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या देखरेखीखाली हे तिन्ही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. हे तिन्ही सर्जिकल स्ट्राईक अत्यंत गुप्त पद्धतीने राबविण्यात आले आणि यशस्वी झाल्यावरच सर्व देशवासियांना त्याची माहिती देण्यात आली.