'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास!

अखेर गांधी घराण्याचे युवराज  गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण निवृत्त झाल्याचे घोषित केले आणि  गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राहुल गांधींच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 15, 2017, 09:25 PM IST
'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास! title=

नवी दिल्ली : अखेर गांधी घराण्याचे युवराज  गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण निवृत्त झाल्याचे घोषित केले आणि  गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राहुल गांधींच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत...

राहुल गांधींची १३ वर्षाची राजकीय कारकीर्द...

१३२ वर्षांच्या काँग्रेसची जबाबदारी आता गांधी घराण्याचा एकुलता एक युवराज राहुल गांधी यांच्यावर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. १९७० साली राहुल गांधींचा जन्म झाला तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. राहुल गांधी १४ वर्षांचे असताना त्यांच्या आज्जी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तर १९९१ साली जेव्हा राहुल गांधी २१ वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील राजीव गांधी यांची हत्या झाली. त्या काळात ते उच्च शिक्षण घेत होते.

शिक्षण आणि परदेशवारी

राहुल गांधींचं शालेय शिक्षण देहरादूनच्या 'दी दून स्कूल'मध्ये झाले... तर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण पार पडले. त्यानंतर कॅमरीज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून एमफील केल्यानंतर लंडन येथील मॅनेजमेंट कंसल्टींग कंपनीत त्यांनी तीन वर्ष काम केले. त्यानंतर भारतात आल्यावरही मुंबईत त्यांनी स्वत: ची कंसल्टींग एजन्सी सुरु केली. या काळात राहुल गांधी यांना राजकारणात रस आहे, असे चित्र नव्हते. परदेशवारीतच राहुल गांधी समाधानी होते. पण २००४ साली राहुल गांधींना राजकारणात पाऊल ठेवावे लागले. गांधी घराण्याचा मतदार संघ उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून त्याच वर्षी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली आणि विजय कायम राखला. या काळापासूनच विरोधकांनी काँग्रेसच्या घराणेशाहीला लक्ष करण्यास सुरुवात केली.

- २००७ साली काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून राहुल गांधींची नियुक्ती झाली

- त्याच काळात तरुणांची नवी फळी काँग्रेसमध्ये तयार करण्यात आली. तरुणांना काँग्रेसमध्ये संधी देण्याची मोहीम राहुल गांधींनी सुरु केली. भारतीय युवा काँग्रेस आणि एनएसयूआयची जबाबदारीही हाती घेतली. त्याच एका वर्षात एनएसयूआयचे सदस्य दोन लाखांवरुन २५ लाख इतके वाढले 

- २००९ साली राहुल गांधी यांची पहिली परीक्षा म्हणून उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे पाहण्यात आले... आणि ८० जागांपैकी २२ जागा काँग्रेसने जिंकल्या... ज्या तोपर्यंतच्या सर्वाधिक जागा होत्या. पण हा विजय तात्पुरता ठरला. पाठोपाठ आलेल्या बिहार निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली

- २०११ साली राहुल गांधींनी सर्वच मीडियाचे लक्ष वेधून घेतले. अँटी लँड अक्वीजीशनवरुन मायावती सरकारला धारेवर धरत शेतक-यांसोबत आंदोलनात सामिल झाले. यात त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं

- २०१२ राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोठी मोहिम सुरु केली. दोन महिन्यात त्यांनी २०० रॅलीज केल्या पण त्याचा करिश्मा निवडणुकीत दिसला नाही

- २०१३ साली राहुल गांधींना काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नेमण्यात आले. २०१४ ची निवडणूक राहुल गांधींसाठी लीटमस टेस्ट होती पण भाजपाचा सर्वात मोठ्ठा विजय देशाने पाहिला आणि काँग्रेसने आपली सगळ्यात मोठं अपयश पाहिलं.


राहुल गांधी - सोनिया गांधी

अपयशांच्या पायऱ्या... 

सोशल मीडियाचा करिश्मा देशानेही पहिल्यांदाच पाहिला. ज्यात काँग्रेसचे युवराज सपशेल अपयशी ठरले. याच दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसचे शेहजादे जनतेच्या प्रश्नांपासून अलिप्त आहे, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. देशात नरेंद्र मोदींचे वारे वाहू लागले आणि यात राहुल गांधी हरवून गेले. मोदींची हवा वाढत गेली आणि त्यात राहुल गांधी कुठेही दिसत नव्हते. त्यात २३ फेब्रुवारी २०१५ पासून राहुल गांधींनी राजकारणातून ५६ दिवसांचा ब्रेक घेतला... आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. २०१५ साली राहुल गांधी यांना देशाने संसदेत पाहिलं... त्यात थेट सूट बूट की सरकार यावर भाष्य करत मोदी सरकारवर टीका करण्यात सुरुवात केली आणि राहुल गांधीचं कम बॅक झालं.

काँग्रेसचं अध्यक्षपद

त्याच काळात राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले. ज्याला ४.६८ मिलीयन फॉलोअर आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात केलेल्या त्यांच्या भाषणाने सगळ्यांचे लक्ष पुन्हा वेधून घेतले. भाजपप्रमाणे सोशल मीडियात काँग्रेसनंही दमदार एन्ट्री घेतली. नुकत्याच गुजरात निवडणुकीत राहुल गांधींची १३ वर्षांतली 'पप्पू' इमेज पुसट झाली आणि याच वेळी ते काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरही विराजमान झाले. आता येत्या काळात मोदी सरकारची क्रेझ कमी करण्याच्या परीक्षेत काँग्रेसचे युवराज पास होतात की नापास याकडे देशाचं लक्ष लागलंय.