Hormonal Injections to Wife: अनैतिक संबंधांचे प्रकार वाढताना दिसत आहेत. हे संबंधांमध्ये कोणता अडथळा येऊ नव्हे म्हणून लोकं टोकाची पाऊले उचलताना दिसतात. यातुनच अनेक भयंकर गुन्हाचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व गुन्हे छोटे वाटतील असा भयानकर प्रकार एका नवऱ्याने आपल्या पत्नीसोबत केला आहे. या पतीने आपल्या पत्नीला सतत 4 वर्षे हार्मोनलची इंजेक्शन दिली. यामुळे त्याची 25 वर्षांची बायको आता 90 वर्षांची दिसू लागली आहे. असे करण्यामागचे कारण ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल.
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचे आपल्या वहिनीसोबतच अनैतिक संबंध होते. त्याला हे संबंध असेच कायम ठेवायचे होते. पण त्याची पत्नी यामध्ये येतेय असे त्याला वाटत होते. वहिनीशी अनैतिक संबंध सुरू ठेवण्यासाठी त्याने तब्बल 4 वर्षे आपल्या बायकोला हार्मोनल इंजेक्शन दिले. सतत हार्मोनल इंजेक्शन्समुळे 25 वर्षीय महिलेचे शरीर तिच्या वर्षांहून अधिक वाढले आणि तिच्या चेहऱ्यावर केसदेखील आले आहेत. यामुळे तिचा चेहरा अगदीच विद्रुप दिसू लागला आहे.
बक्सर जिल्ह्यातील ब्रह्मपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात हा प्रकार घडला. येथे एका महिलेच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. आपल्या मुलीला हार्मोनल इंजेक्शन दिल्याची तक्रार त्यांनी केली. यानंतर बक्सर एसपीच्या निर्देशानुसार उदावंतनगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भोजपूर जिल्ह्यातील उदवंत नगर येथील एका गावात पीडित तरुणी राहत होती. तिचा 2018 मध्ये विवाह झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या नवऱ्याचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर, त्याने तिच्या शरीरात हार्मोन्स टोचण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तिच्या शरिरात गुंतागुंत निर्माण झाली. अत्याचार सुरूच असताना महिलेने तिच्या पालकांकडे तक्रार केली. पण आरोपींनी तिला पाटणाच्या बिहटा ब्लॉकमध्ये एका नातेवाईकाच्या घरी डांबून ठेवले.
पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्या बहिणीबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. बराच शोध घेतल्यानंतर त्याला बिहटा येथील जागा शोधण्यात यश आले आणि त्यांनी आपल्या बहिणीची सुटका केली.
पीडितेला अत्यंत वाईट अवस्थेत पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. 'आम्ही बक्सर आणि भोजपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एफआयआर नोंदवला आहे आणि महिलेची सुटका केली आहे आणि तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. सध्या तपास अधिक तपास सुरु आहे,' अशी माहिती उदवंत नगर पोलीस स्टेशन भोजपूरचे एसएचओ बैजनाथ चौधरी यांनी दिली.