मोठी बातमी ! पटणा 2013 बॉम्बस्फोट प्रकरण, 4 जणांना फाशीची शिक्षा

2013 मध्ये पटना इथं पीएम मोदींच्या रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणातील दोषींना आज शिक्षा जाहीर करण्यात आली.

Updated: Nov 1, 2021, 05:05 PM IST
मोठी बातमी ! पटणा 2013 बॉम्बस्फोट प्रकरण, 4 जणांना फाशीची शिक्षा title=

पटणा : 2013 मध्ये पाटणाच्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए कोर्टाने दोषींना शिक्षा जाहीर केली आहे. नऊ दोषींपैकी चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दोन दोषींना जन्मठेप, दोघांना 10 वर्षे आणि एकाला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये पीएम मोदींच्या रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाले होते.

27 ऑक्टोबर 2013 ची घटना 

पाटणा इथल्या गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. मात्र, त्याआधीच बॉम्बस्फोटांच्या आवाजाने पाटणा हादरलं. पंतप्रधान मोदी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधीच गांधी मैदानासह पाटणा येथे एकापाठोपाठ एक आठ स्फोट झाले, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला आणि ८३ हून अधिक लोक जखमी झाले.

आठपैकी दोन स्फोट रॅली संपल्यानंतर सुरक्षा तपासणीदरम्यान झाले. स्फोटांसाठी कमी शक्तीशाली बॉम्बचा वापर करण्यात आला होता. पण याची भीषणता भयानक होऊ शकली असती.  कारण खचाखच भरलेल्या गांधी मैदानाभोवती स्फोटांच्या  बातम्यांमुळे रॅलीमध्ये गदारोळ होण्याची शक्यता होती.

बॉम्बस्फोटावेळी मंचावर उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचं म्हटलं होतं. पण त्याचमुळे रॅलीत चेंगराचेंगरी झाली नाही. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषणाच्या शेवटी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करावं लागलं.

पहला स्फोट ११.४५ वाजता

लोकसभा निवडणुकीसाठी गांधी मैदानात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला पोहोचण्यापूर्वीच स्फोट झाले होते. पहिला स्फोट गांधी मैदानाजवळ सकाळी 11.45 च्या सुमारास झाला. तेव्हा शाहनवाज हुसेन मंचावरून भाषण देत होते. स्फोटानंतर जमावात गोंधळ उडाला तेव्हा शाहनवाज म्हणाले की, टायर फुटला आहे. काळजी नाही. दुसऱ्यांदा 12.10 वाजता लागोपाठ दोन स्फोट झाले. त्यावेळी सुशील मोदी बोलत होते.