close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

....तर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकणार

तर सरकारी तेल कंपन्यांना पाच ते सहा रुपये प्रति लिटर वाढ करणे अपरिहार्य ठरते.

Updated: Sep 17, 2019, 11:20 AM IST
....तर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकणार

मुंबई: सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या तेलक्षेत्रांवर हुथी बंडखोरांकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव वधारला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. अरामकोवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला ५.७ मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) म्हणजेच ५ टक्के उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जर कच्चे तेल प्रतिबॅरल १० डॉलर्सनी महागले तर सरकारी तेल कंपन्यांना पाच ते सहा रुपये प्रति लिटर वाढ करणे अपरिहार्य ठरते. कच्च्या तेलाच्या किंमतीत काल ६ डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच राहिली तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारात ७२ डॉलरच्या उंबरठय़ावर असलेल्या खनिज तेलाच्या किंमती आता गेल्या चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर कच्च्या तेलाच्या किमती लवकरच प्रतिबॅरल ७५ डॉलर्सचा स्तर गाठतील. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे. 

१९८८ नंतर प्रथमच एका रात्रीत तेलाच्या किंमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता कच्च्या तेलाच्या किंमतीमधील दरवाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरली आहे. सध्या अर्थव्यवस्थेचा विकासदर खालावल्यामुळे केंद्र सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मंदी दूर करण्यासाठी सरकारने अनुदानांची आणि विविध आर्थिक सवलतींची खैरात गेल्या काही दिवसांपासून केली आहे. ते या खनिज तेलाच्या वाढीव दरांनंतर शक्य होणार नाही.