मध्य प्रदेश विधानसभेच्या 16 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी वाद निर्माण झाला आहे. देशाचे पहिले आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो हटवून त्याठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे. हा फोटो विधानसभा अध्यक्षांच्या मागे लावण्यात आलाा होता. दरम्याना मागे अध्यक्षांच्या उजव्या बाजूला असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो तसाच ठेवण्यात आला आहे. डाव्या बाजूला असणारा पंडित नेहरुंचा फोटोच फक्त हटवण्यात आला आहे.
काँग्रेस नेत्यांनी फोटो हटवण्याला विरोध केला असून, पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरुंचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. तसंच जर फोटो स्वत:हून लावला नाही तर आम्ही लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सत्राची सुरुवात अध्यक्ष गोपाल भार्गव यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहात स्वागत करून त्यांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू केली. राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर आणि मनोज यादव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठवड्याभरातच होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे.
अध्यक्ष गोपाल भार्गव यांनी यावेळी सभागृहाला काँग्रेसचे उमंग सिंघर यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान भाजपाने अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना उमेदवारी दिली आहे.