आज निवडणार सीबीआय संचालक, जाणून घ्या खास गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित 3 सदस्यांची उच्च समिती सीबीआयचे नवे संचालक नियुक्त करतील. यासाठी थोड्याच वेळात यांची मिटींग होणार आहे.

Updated: Jan 24, 2019, 09:52 AM IST
आज निवडणार सीबीआय संचालक, जाणून घ्या खास गोष्टी  title=

नवी दिल्ली : माजी संचालक आलोक वर्मा यांना 10 जानेवारीला सीबीआय संचालक पदावरुन हटविण्यात आले होते. आता नव्या संचालकाची आज निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित 3 सदस्यांची उच्च समिती सीबीआयचे नवे संचालक नियुक्त करतील. यासाठी थोड्याच वेळात यांची मिटींग होणार आहे. या कमेटीमध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, विरोधी पक्षनेता मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान मोदी सहभागी असतील. सीबीआय संचालकाची निवड प्रक्रीया ही पारदर्शी असायला हवी असे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले. योग्यता आणि वरिष्ठतेच्या आधारावर ही निवड व्हावी असेही कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. कॉंग्रेस नेते आणि निवड समिती सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींकडे संभावित संचालक उमेदवारांची यादी मागवली आहे. मिटींगच्या 3 दिवस आधी ही यादी मिळावी अशी त्यांची मागणी होती. पण ती यादी खर्गेंपर्यंत पोहोचली नाही.

संभाव्य दावेदार

रीना मित्रा : 1983 बॅचच्या रीना मित्रा सध्या गृह मंत्रालयात विशेष सचिव ( आंतर सुरक्षा) आहेत. त्यांनी 5 वर्षे सीबीआयमध्ये काम केले आहे. दर मित्रा यांना सीबीआय प्रमुख नेमल्यास त्या देशाच्या पहिल्या महिला सीबीआय प्रमुख ठरतील. 

वाय.सी.मोदी :  योगेश चंद्र मोदी हे 1984 च्या बॅचचे असम- मेघालय कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे महानिदेशक आहेत.  गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीत सर्वोच्च न्यायालयातर्फे नेमलेल्या शोध समितीमध्ये वायसी मोदी सहभागी होते. याच कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट दिली होती. 2002   गुजरात दंगलीवेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. 

रजनीकांत मिश्रा : हे बीएसएफ डायरेक्टर जनरल 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते सीबीआयमध्ये असून यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत. 

परमिंदर रॉय : परमिंदर हे 1982 च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे आयपीएस आहेत. ते 31 जानेवारीला निवृत्त होतील. रॉय सध्या स्टेट विजिलन्स ब्युरोचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत, परंतु राय यांना सीबीआयमध्ये काम करण्याचा अनुभव नाही.