नवी दिल्ली : राजकीय मुद्यांवर एकमेंकावर हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर आल्यावर राजकीय शिष्टाचार पाळतात.
मंगळवारी देशाचे १४ राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. त्या समारंभापूर्वी एक दृश्य पाहायला मिळाले. संसदेच्या सेंट्रल हॉलच्या कॉरी़डोरमध्ये दोघे नेते अचानक समोरासमोर आलेत. पंतप्रधान मोदी यांनी कोणताही क्षण न दवडता राहुल गांधींचा हालहवाल विचारला. यावर काँग्रेस उपाध्यक्षांनी अत्यंत अदबीने उत्तर दिले.
रामनाथ कोविंद यांच्या पूर्वी पंतप्रधान मोदी संसद भवनात पोहचले. कोविंद संसदेत पोहचल्यावर पीएम मोदी आपल्या चेंबरमधून बाहेर आले, आणि संसदेच्या गेटमधून जात होते. त्यावेळी कॉरीडोअरमध्ये राहुल गांधी दिसले. हा केवळ योगायोग होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही नेते समोरासमोर आले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींना विचारले की कसे आहात राहुल जी? त्यावर अत्यंत नम्रपणे राहुल गांधी यांनी मोदींकडे हात पुढे करत आणि हसत पंतप्रधानांना म्हटले सर ठीक आहे मी...
यानंतर पंतप्रधान यांनी राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही विचारपूस केली आणि नंतर ते रामनाथ कोविंद यांच्या स्वागतासाठी रवाना झाले.