नवी दिल्ली : देशात सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे. पण नेहमी मोठ्या जल्लोषात होणाऱ्या उत्सवांवर यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचं सावट आहे. कोरोना हे देशावर आलेले संकट आहे आणि या लढाईत आपला विजय अटळ आहे, अशी ठाम भूमिका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यामातून घेतली. शिवाय देशातील जनतेला संयम बाळगण्याचे देखील आवाहन केले. त्याचप्रकारे त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देखील देशाच्या जनतेला दिल्या.
विजयादशमीचं हे शुभ पर्व असत्यावर सत्याचा विजय म्हणजे एका अर्थाने संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचं त्यांनी देशातील जनतेला संबोधित करताना सांगितले. आज प्रत्येक जण मोठ्या संयमाने जगत आहे. मर्यादांचे पालन करत सण साजरे करत आहेत. देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या.
परंतु सध्या सर्वत्र शुकशूकाट आहे. ठिकठिकाणी जत्रा भरते, मोठं उत्साहाचं वातावरण असतं मात्र यंदाच्या वर्षी देशावर कोरोनाचं सावट आहे. पण या लढाईचा सामना आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे या या लढाईत आपला विजय अटळ असल्याचं देखील मोदींनी सांगितलं.
शिवाय देशातील प्रत्येक जवानासाठी घरात एक दिवा लावण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. आज ज्या कुटुंबातील मुलं-मुली घरापासून लांब आहेत. देशाची सेवा करत आहेत त्यांना मी नमन करतो. त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत असं म्हणत त्यांनी जवानांचे आभार मानले.