अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान मोदींचं खासदारांना आवाहन

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचा होणार आमना-सामना

Updated: Jul 20, 2018, 09:04 AM IST
अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान मोदींचं खासदारांना आवाहन title=

नवी दिल्ली: आज विरोधकांकडून लोकसभेत मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. चार वर्षात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून सर्वच खासदारांना गोंधळ न घालण्याचं आवाहन केलं आहे. पण बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असल्यानं मोदी सरकार सुरक्षित आहे. 

लोकसभेत होणाऱ्या चर्चेतून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांना आज संधी मिळणार आहे. तर गेल्या चार वर्षात काय काय कामं केली हे सरकारच्या वतीनं देशाला सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी ही सज्ज असतील.

लोकसभेत सकाळी ११ वाजता चर्चेला सुरुवात होईल. तेलुगू देसम पाटीनं हा अविश्वास ठराव मांडलाय. त्यामुळे त्यांचे खासदार चर्चेला सुरूवात करतील. मोदी सरकारच्या बाजूनं पहिलं भाषण भाजपचे खासदार राकेश सिंह करतील. त्यानंतर काँग्रेसकडून राहुल गांधी भाषण करण्याची शक्यता आहे. तर चर्चेच्या शेवटी पंतप्रधान  मोदी अविश्वास ठरावाला उत्तर देतील. त्यानंतर मतदान होईल. 

सरकारचं पारडं जड

सध्या लोकसभेत एकूण ५३४ खासदार आहेत. त्यापैकी २७३ खासदार भाजपचे आहेत. त्यात एनडीएच्या घटक पक्षाचे खासदार धरले तर एनडीएचा आकडा ३१३ होते.
 
काँग्रेससह सर्व विरोधकांची एकूण संख्या फक्त १३१ आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात मोदींचा विजय निश्चित आहे. 

आज काँग्रेसच्या वाट्याला लोकसभेतल्या चर्चेची ३८ मिनिटं येणार आहेत. त्याचा काँग्रेस अध्यक्ष पुरेपूर वापर करतील अशी अपेक्षा आहे. देशात वाढती बेरोजगारी, बेजार शेतकरी, झुंडशाहीनं होणारा हिंसाचार, काश्मीरची चिघळणारी स्थिती या सगळ्या अडचणीच्या मुद्द्यांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारला घेरणारं भाषण करतील असं बोललं जातंय.

तर भाजपकडून पंतप्रधान मोदी स्वतः या चर्चेला उत्तर देतील. त्यामुळे गेल्या चार वर्षातल्या कामांचा पाढा वाचताना २०१९च्या निवडणूकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवतील अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगते आहे.