नरेंद्र मोदींचे लक्ष उत्तर प्रदेशवर, फेब्रुवारीत ७ वेळा याच राज्याचा दौरा

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Updated: Feb 14, 2019, 09:33 AM IST
नरेंद्र मोदींचे लक्ष उत्तर प्रदेशवर, फेब्रुवारीत ७ वेळा याच राज्याचा दौरा title=

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच नेते प्रयत्न करताहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागे नाहीत. त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत उत्तर प्रदेशात दौऱ्यावर जात आहेत. आता येत्या १९ फेब्रुवारीला कुंभमेळ्यासाठी नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये येणार आहेत. पौर्णिमेच्या निमित्तने संगमस्नानासाठी नरेंद्र मोदी प्रयागराजला येणार असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले. त्यांचा हा दौरा जवळपास निश्चित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सहा वेळा नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी गेले आहेत. आता प्रयागराजच्या निमित्ताने ते याच महिन्यात सातव्यांदा उत्तर प्रदेशला येत आहेत. यावेळी ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातही जाणार आहेत. प्रयागराजला भेट दिल्यावर गुरु रविदास जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही जाणार आहेत. 

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पण उत्तर प्रदेशात सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिल्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार, उमेदवार निश्चिती, आघाडी यावर चर्चा आणि बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठीच ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियांका गांधी या दोघांकडे उत्तर प्रदेशची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे सप आणि बसप या दोन्ही एकेकाळच्या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक रंगतदार होण्याचा अंदाज आहे.