भाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी

 राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत.

Updated: Aug 24, 2018, 07:41 PM IST
भाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी   title=

लंडन : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत. राहुल यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना अरब देशांमधील मुस्लीम ब्रदरहुडशी केलेय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. 

लंडनमधील आंतरराष्ट्रीय संस्थेच्या धोरणात्मक अभ्यासावर राहुल गांधी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संघावर हल्ला चढवला. आजपर्यंत कोणत्याही पक्षाने भारतातील घटनात्मक संस्थावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, संघाची विचारधारा ही मुस्लीम ब्रदरहुडप्रमाणे आहे, असे राहुल म्हणालेत. नोटबंदी निर्णय हा आरएसएसचा होता. नोटबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँक, अर्थमंत्री यांना वगळून पंतप्रधान मोदींच्या डोक्याने नोटबंदीची अंमलबजावणी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच डोकलाममधील चीनच्या घुसखोरीवरुनही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलेय. याला भाजपकडून उत्तर देण्यात आलेय.

दरम्यान, राहुल गांधी यांनी बोचरी टीका केल्यानंतर भाजपकडूनही तसेच प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी हे अपरिपक्व असल्याचे म्हटलेय. राहुल यांना भारताची जाण नाही, सरकारची विचारधारा ही मुस्लीम ब्रदरहुड प्रमाणे राहुल गांधी म्हणत आहेत, तुम्ही तर खासदार असून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहात, अशी प्रतिक्रिया दिलेय.