नवी दिल्ली : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अराजकीय मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना मोदींनी उत्तरं दिली. याच मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी पुण्यातल्या रिक्षावाल्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगितला.
'अर्ध्या बाह्यांचा कुर्ता, पायजमा आणि खांद्यावर झोळी घेऊन मी तेव्हा ट्रेननी फिरायचो. पुणे स्टेशनवरून संघाच्या कार्यालयात जात असताना एक रिक्षावाला माझ्यासोबत हळू हळू रिक्षा चालवत होता. १००-२०० मीटरपर्यंत अशी रिक्षा चालवल्यावर माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. तुमची रिक्षा खराब झाली आहे का? असा प्रश्न मी त्याला विचारला. तेव्हा तुम्ही रिक्षात बसणार नाही का? असा प्रतीप्रश्न रिक्षावाल्याने केला', असं मोदींनी अक्षय कुमारशी बोलताना सांगितलं.
यापुढे मोदी म्हणाले, 'मी चालत जातोय सांगितल्यावर रिक्षावाल्याने तुम्ही समाजवादी आहात का? असा प्रश्न विचारला, तेव्हा मी तर अहमदाबादी असल्याचं रिक्षावाल्याला सांगितल्याचं मोदी म्हणाले.
'पुण्यातले समाजवादी लोकं स्टेशनवर लोकांसमोर रिक्षामध्ये न चढता लांब जाऊन हळूच रिक्षामध्ये बसतात. आपण साधे असून आपले राहणीमानही साधे असल्याची छाप पाडण्यासाठी समाजवादी असं करतात, त्यामुळे मलाही तुम्ही समाजवादी असल्याचं वाटलं. तुम्हीही थोडावेळाने रिक्षेमध्ये बसाल, असा माझा अंदाज होता, ' असं रिक्षावाला मला म्हणाल्याचा किस्सा मोदींनी सांगितला.
यामध्ये मला कोणाचीही आलोचना करायची नाही, तर हा किस्सा माझ्यासोबत घडला आहे, असं वक्तव्य मोदींनी अक्षय कुमारशी बोलताना केलं.