श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू आहे. कुपवाडा येथील दाना बहकच्या जंगलात सुरु असलेल्या चकमकीत पोलीस आणि लष्कराचे जवान दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.
दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराचे जवान पोहोचले आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. यावेळी जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.
Encounter has started in the forest area of Dana Behak, Warnow area of Kupwara. Police and Army are on the job. Further details shall follow: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) September 5, 2020
याआधी शुक्रवारी पुलवामा येथील बाबरौरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शुक्रवारी काश्मीरमधील ही दुसरी चकमकी होती. पुलवामापूर्वी बारामुला येथे झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाने दोन दहशतवादी ठार केले. येदिपोरा पट्टनमध्ये शुक्रवारी सकाळी दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यात एक मेजर जखमी झाले.
काश्मीरमधील सुरक्षा दल दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी काम करत आहे. पोलीस आणि सैन्याच्या या कारवाईने दहशतवाद्यांमध्ये देखील घबराट पसरली आहे. दहशतवाद्यांची ही दहशत संपवण्यासाठी सुरक्षा दल मोहिम राबवत आहे.
काही दिवसांपूर्वी बारामुल्ला येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अचानक ग्रेनेड फेकण्यात आले, त्यानंतर लष्कराचा ताफा थांबविण्यात आला. या ग्रेनेड हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी सैन्याच्या वाहनाला लक्ष्य केले होते. पण ग्रेनेड हा गाडीवर न पडता रस्त्यावर पडला.