ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्...

उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.   

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2024, 07:36 PM IST
ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्... title=

उत्तर प्रदेशात अपहरण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घराबाहेरुन या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, याप्ररणी 8 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीडित मुलाचा शेजारीदेखील आहे. सर्कल अधिकारी अशोक सिंग यांनी सांगितलं आहे की, "खंडणी मागण्याच्या उद्धेशाने आरोपींनी मुलाचं अपहरण केलं होतं. त्यांनी मुलाला ट्रॉली बॅगमध्ये ठेवलं होतं. श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला".

अटक करताना झालेल्या चकमकीत आठही आरोपी जखमी झाल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. त्यांच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. "सर्व आरोपी 20 वर्षाच्या आसपासचे आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

औरैयाचे पोलीस अधीक्षक चारू निगम यांनी सांगितलं की, पीडित मुलाचा शेजारी रियाज सिद्दीकी याने सहाव्या वर्गात शिकणाऱ्या या मुलाच्या अपहरणाची योजना आखली होती. अशोक सिंग यांनी सांगितलं आहे की, "मोहम्मद शकील यांनी पोलीस ठाण्यात आपला 12 वर्षांचा मुलगा शुभन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. घऱाबाहेर खेळत असताना तो बेपत्ता झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं". मोहम्मद शकील यांचं सोन्याच्या दागिन्यांचं दुकान आहे. 

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी त्यांनी शुभनच्या मित्र आणि स्थानिकांकडे चौकशी केली. प्राथमिक तपासादरम्यान, शुभनला अखेरच्या वेळी रियाजसोबत पाहिल्याचं समोर आलं. तसंच मागील काही दिवसांपासून तो रियाजसह फार दिसत होता असं स्थानिकांनी सांगितलं. 

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सिद्धिकी आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरु केला. त्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले. यामध्ये तो औरियात फिरत असल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलं. यादरम्यान आरोपी राजधानीत असल्याचं दिसलं. 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "नोएडा आणि दिल्ली पोलिसांकडून आम्ही मदत मागितली होती. अखेर, आरोपींपैकी एक अवधेश कुमार मिश्रला रविवारी पकडण्यात आलं. चौकशी केली असता त्याने मुलगा जतीन दिवाकर, रवी कुमार आणि दीपक गुप्ता या तीन साथीदारांसह दिल्लीतील पश्चिम विहारजवळ होता अशी माहिती दिली”.

दिल्ली पोलिसांच्या मदतीने औरिया पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या कारमधू ट्रॉली बॅग मिळवली. बॅग उघडून पाहिली असता त्यात शुभमचा मृतदेह होता. त्याचे हात आणि पाय बांधलेले होते. पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबाला ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. 

आरोपींनी सिद्दीकी आणि त्याचे सहकारी शोभन यादव, अंकित कुमार आणि आशिष मिश्रा यांचा सहभाग असल्याची कबुली दिली. ते तिघे अजूनही औरैयामध्ये असल्याचेही त्यांनी उघड केलं. मुलाच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्याची योजना होती असं अवधेशने सांगितलं आहे. 

पोलिसांनी आरोपींना सिद्धीकाला फोन करुन खंडणीचे पैसे घेण्यासाठी बोलावण्यास सांगितलं. रियाज, शुभम, अंकित आणि आशिष घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना पोलीस तिथे असल्याचं जाणवलं. यानंतर त्यांनी गोळीबार सुरु केला. यादरम्यान अवधेश, जतीन, रवी आणि दीपक यांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं असता त्यांच्या पायाला गोळी लागून जखमी झाले असं पोलिसांनी सांगितलं आहे.