बिहारमधील एक 18 वर्षीय तरुण जेव्हा पोलिसांच्या गणवेशात पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्याकडे पिस्तूलदेखील असल्याने पोलीस आश्चर्यचकित झाले होते, आपल्याला आयपीएस अधिकारी बनवण्यासाठी एका व्यक्तीला 2 लाख रुपये दिले होते असा दावा त्याने केला होता. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने (National Crime Investigation Bureau) मिथिलेश कुमार मांझीचा पोलीस गणवेशातील व्हिडीओ शेअर केल्यानंतर ही घटना उजेडात आली. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अनेकांना त्या तरुणाबद्दल सहानुभूती वाटली. त्याची 2 लाखांना फसवणूक झाल्याने अनेकांना दया आली. पण पोलिसांनी आता दावा केला आहे की, मांझी हा वाटतो तितका निर्दोष नसावा. तपास केल्यानंतर बिहार पोलिसांना मांझीच्या आरोपांना दुजोरा देणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
20 सप्टेंबर रोजी, बिहारच्या जमुई येथे एका तरुणाने आयपीएस अधिकाऱ्याच्या गणवेशात बंदुकीसह पोलीस ठाण्यात हजेरी लावली. ही बंदूक बनावट असल्याचं नंतर आढळून आलं. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्या दाव्यानुसार, मनोज सिंग नावाच्या व्यक्तीने त्याला IPS अधिकारी बनण्यास मदत करण्यासाठी 2 लाखांच रक्कम घेत कथितपणे फसवलं.
काही महिन्यांपूर्वी मी सिंगला भेटलो आणि आयपीएस अधिकारी होण्यासाठी आपल्या मामाकडून पैसे उसने घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. मांझी पुढे म्हणाला की, सिंगने त्याला पोलीस ठाण्यात जाण्यासाठी गणवेश दिला. तपासादरम्यान त्याने सिंगचा मोबाईल नंबरही पोलिसांना दिला होता. पोलिसांनी मांझीची कोठडीतून सुटका केली आणि सिंगची चौकशी सुरू केली.
बिहार पोलिसांनी ही सगळी मांझीने रचलेला गोष्ट असून, त्यात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. जेव्हा पोलिसांनी मांझीच्या मामाकडे पैसे दिले होते का? अशी चौकशी केली तेव्हा त्यांनी नकार दिला.
त्याच्या मामांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी एकदा आईच्या उपचारासाठी 60,000, घर बांधण्यासाठी 45,000 आणि कुटुंबात लग्नाच्या वेळी 50,000 दिले होते. मात्र त्याला नोकरीसाठी पैसे दिले नाहीत. यानंतर पोलिसांनी मांझीने सांगितलेल्या परिसरात राहणाऱ्या मनोज सिंग नावाच्या प्रत्येकाशी संपर्क साधला. मात्र त्याला त्यापैकी कोणाचीही ओळख पटली नाही.
तसंच, मांझीने दिलेला मनोज सिंग याचा मोबाइल क्रमांक बंद असून तो दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी मांझीचं 20 सप्टेंबर रोजी काय लोकेशन होतं, याचा शोध घेतला असता तो त्याने दावा केलेल्या ठिकाणी त्या दिवशी नव्हता हे आढळलं. तो लखीसराय येथे होता जिथे त्याने गणवेश स्वतः विकत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. एसएचओ मिंटू कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिस तपासात मांझीने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जात असून, ती निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.