Pulwama Attack : सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा निषेध, कठोर कारवाई करण्याची मागणी

पक्षनेते म्हणतात... 

Updated: Feb 16, 2019, 02:40 PM IST
Pulwama Attack : सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा निषेध, कठोर कारवाई करण्याची मागणी

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचं गांभीर्य आणि देशभरात उसळलेली संतापाची लाट पाहता मंत्रीमंडळानेही याविषयी पावलं उचलण्यास सुरुवात केली. शनिवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. ज्यामध्ये दहशतवादाशी लढण्यासाठीच्या आणि पुलवामा हल्ल्याच्या मुद्द्यावर विचारविनिमय झाला. 

एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या बैठकीमध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोध करण्यात आला. सोबतच या हल्ल्याच्या निषेधार्थ एक पत्रकही प्रसिद्ध करण्यात आलं. 'सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही विरोध करतो आणि सोबतच सीमेपलीकडील देशातून या दहशतवादी कारवायांना दिल्या जाणाऱ्या समर्थनाचाही आम्ही विरोध करतो', असं त्या पत्रकात म्हटलं गेलं आहे. 

'गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारताकडून ही आव्हानं आणि हे मुद्दे नेहमीच अतिशय दृढतेने आणि खंबीरपणे हाताळले गेले आहेत. आजच्या घडीला आम्ही दहशतवादाशी लढण्यासाठी, देशाची एकता आणि सन्मान जपण्यासाठी सैन्यदलासोबत एकजुटीने उभे आहोत', असा निर्धार त्या पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे. 

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीनंतर गुलामनबी आझाद, संजय राऊत या नेतेमंडळींनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अशा प्रकारची पत्रकं पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतरही जारी करण्यात आली होती. आता आम्ही त्यांच्याकडे (सरकारकडे) थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.