गुरुग्राम : गुरूग्राममधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलाय.
खट्टर यांनी प्रद्युम्नचे वडिल बरून ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांचं सांत्वन करत हत्येचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केल्याची त्यांनी माहिती दिली. तसंच पुढचे तीन महिने गुरूग्राममधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलचा ताबा हरयाणा सरकारनं घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय.
रायन स्कूलमध्ये प्रद्युम्नची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमार याला अटक करण्यात आली आहे. मात्र अशोक कुमारला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा आरोप अनेक पालकांनी केलाय. त्यामुळं सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत होती.