VIDEO : जाणून घ्या भारतीय लष्कराच्या 'जय भारत' यात्रेविषयी

हॉट एअर बलूनमधून पूर्ण करणार ३ हजार २३६ किलोमीटरचा प्रवास   

Updated: Dec 3, 2018, 08:49 AM IST
VIDEO : जाणून घ्या भारतीय लष्कराच्या 'जय भारत' यात्रेविषयी

मुंबई : देशसेवेसाठी सज्ज असणाऱ्या सैन्यदलातील जवानांचा एक अनोखा उपक्रम सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. एका वेगळ्या मार्गाने भारतीय लष्कराविषयी तरुणाईमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हणून ही मोहिम राबवण्यात आली असून, जय भारत असं तिचं नाव आहे. आजवर विविध आव्हानांवर मात करत नवे मैलाचे दगड प्रस्थापित करणाऱ्या भारतीय लष्कराच्या या यात्रेचीच सर्वदूर चर्चा सुरु आहे. 

भारतीय लष्काराचे बावीस जवान 'हॉट एअर बलून'मधून भारत भ्रमणावर निघाले आहेत. तरुणाईमध्ये जागृती निर्माण करणं हा या यात्रेमागतचा मुख्य हेतू आहे. ६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या 'जय भारत' यात्रेचा ३० डिसेंबरला कन्याकुमारी येथे समारोप होणार आहे. 

देशातील १२ राज्यांतून एकूण ३ हजार २३६ किलोमीटरचा प्रवास या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अनोख्या यात्रेविषयी सांगताना त्यात सहभागी, विजयकुमार, या सैन्यदल जवानाने त्याविषयीची माहिती दिली. 

'सुजाण तरुणाईला सैन्यदलात भरती होण्यासाठी, त्याविषयी आवश्यक माहिती देण्यालाठी म्हणून आम्ही हे पाऊल उचललं आहे', असं ते म्हणाले. 

'जय भारत' यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी अकोल्या हा हॉट एअर बलून दाखल झाला तेव्हा त्या ठिकाणी कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. तरुणाई आणि नागरिकांनी यावेळ तेथे प्रचंड गर्दी केली होती. अकोल्यातून हॉट एअर बलून नांदेडकडे रवाना झाले. असीम धैर्य अन त्यागाचा वसा घेऊन शूरवीर जवान देशसेवेसाठी कायम सज्ज असतात. आता देशाच्या तरूणाईमध्ये लष्कराबाबत जागृती आणि देशप्रेमाची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.