नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय' PTI वृत्तसंस्थेकडून घेण्यात आलेल्या चिनी राजदुतांच्या मुलाखतीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. 'पीटीआय'चे हे वार्तांकन राष्ट्रविरोधी आणि देशाच्या अखंडतेस बाधा आणणारे असल्याचा आरोप प्रसार भारतीने केला आहे. त्यामुळे भविष्यात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी असलेल्या कराराचा फेरआढावा घेऊ, असा निर्वाणीचा इशाराही प्रसार भारतीकडून देण्यात आला आहे.
१९४९ साली सुरु झालेली पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. 'पीटीआय'साठी ४०० पत्रकार व पाचशे अंशकालीन वार्ताहर आहेत. दिवसाला ते २ हजार बातम्या व २०० छायाचित्रे देतात. अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे परदेशी बातम्यांसाठी करार आहेत. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय'कडून नुकतीच चीनचे राजदूत सन वेडाँग यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये वेडाँग यांनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे पीटीआय वादात सापडली आहे.
प्रसार भारतीकडून यासंदर्भात पीटीआयला पत्र पाठवण्यात आले आहे. आम्ही लवकरच या पत्राला उत्तर देऊ, असे 'पीटीआय'कडून सांगण्यात आले. प्रसारभारतीची भूमिका आणि कराराच्या फेरआढाव्याचा विचार अन्याय्य व चुकीचा आहे. चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती, त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे. मात्र, आम्ही लवकरच प्रसारभारतीसमोर तथ्य आणि खऱ्या गोष्टी मांडू, असे 'पीटीआय'ने म्हटले आहे.