पंजाब सरकारचा मोठा निर्णय़, १ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन

लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारं दुसरं राज्य

Updated: Apr 10, 2020, 07:27 PM IST
पंजाब सरकारचा मोठा निर्णय़, १ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन

मुंबई : कोरोनाचं पंजाबमध्ये संकट वाढत असताना पंजाब सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने १ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणयाचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये १ मे पर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने शुक्रवारी याची घोषणा केली. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा २१ दिवसांचा लॉकडाऊन संपायला ४ दिवस बाकी असताना पंजाबने १ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

लॉकडाऊनबाबत शनिवारी पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. पंजाबच्या आधी ओडिशातील बीजेडी सरकारने देखील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय़ घेतला होता. 

याआधीच पंजाबच्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, 'आम्ही केवळ शेतकर्‍यांना लॉकडाऊनमध्ये सवलत देऊ, कारण यावेळी चांगले पीक आले आहे. कोरोनाची आकडेवारी भयानक आहे. ही गोष्ट चांगली नाही आणि लोकांना सुरक्षित ठेवणे आमचे कर्तव्य आहे. आत्ता लॉकडाउन काढणे योग्य नाही.' कॅबिनेट बैठकीनंतर पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं की, जगभरातून 95,000 लोकं अमृतसर आणि इतर ठिकाणी परत आले आहेत. त्यांना नियंत्रित ठेवणे हे आमचे मुख्य ऑपरेशन बनले आहे. ते नियंत्रणात आहे. निजामुद्दीनचा मुद्दाही पुढे आला. निजामुद्दीनहून परतलेले 533 लोकांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनची 27 प्रकरणे आहेत, जी परदेशात गेलेली नाहीत. 2,032 लोकांना वेगळं ठेवण्यात आले आहे.'