चंदीगड : पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींदरम्यान दिवाळीपूर्वी पंजाबमधील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब मंत्रिमंडळाने घरगुती ग्राहकांच्या वीज दरात प्रति युनिट ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आजपासून लागू झाला आहे.
या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 3,316 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. सीएम चन्नी म्हणाले की, 'घरगुती ग्राहकांसाठी आम्ही वीज दर प्रति युनिट ३ रुपयांनी कमी करत आहोत.
नवीन दरानुसार 100 ते 300 युनिटसाठी 4 रुपये प्रति युनिट दराने आकारण्यात येणार आहे, जो पूर्वी 7 रुपये प्रति युनिट होता. याशिवाय 300 पेक्षा जास्त युनिटसाठी 5 रुपये प्रति युनिट दर आकारला जाणार आहे.
पंजाबच्या जनतेसाठी ही दिवाळीची मोठी भेट असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार पंजाबमधील जनतेला स्वस्त वीज हवी आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत.
पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. केजरीवाल यांनी जूनमध्ये घोषणा केली होती की, राज्यात आपचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज दिली जाईल. या घोषणेनंतर नवनियुक्त मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी वीज स्वस्त करण्याचा दबाव होता.