Punjab News : पंजाबच्या (Punjab) गुरुदासपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने (Punjab Police) महिला शेतकऱ्यावर हात उचलल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने महिला शेतकऱ्याच्या जोरदार कानशिलात लगावली आहे. हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंजाब पोलीस विभागाच्या हवालदाराने ही मारहाण केल्याचे समोर आले आहे. पोलीस हवालदाराने महिलेच्या जोरात कानशिलात लगावली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्व प्रकारानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या व्हिडिओची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला धारेवर धरले आहे. या पोलीस हवालदाराविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना गुरुदासपूरच्या भामडी गावातील आहे. पोलिसांचे पथक दिल्ली कटरा राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी आले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाचे पथकही पोलिसांसोबत होते. भूसंपादनादरम्यान प्रशासन आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. त्याचवेळी महिला शेतकऱ्याला पोलीस हवालदाराने कानाखाली लगावली. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांना ओढून त्यांच्या पगड्या काढल्याचा आरोपही पोलीस कर्मचार्यांवर केला जात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण आहे. या सर्व प्रकारानंतर आंदोलकांनी रेल्वेमार्ग अडवून धरण्यास सुरुवात केली आहे.
कशासाठी सुरु आहे आंदोलन?
दिल्ली कटरा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. एप्रिल महिन्यातही याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलनात ट्रॅक्टरवर आपले ट्रॅक्टर उभे केले होते. त्यावेळी प्रशासनाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलने थांबवली होती. मात्र आता हे प्रकरण पुन्हा तापले आहे.
दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी असलेल्या सुविधांबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला प्रवाशासाठी बस न थांबणाऱ्यांवर कारवाई करण्याविषयी भाष्य करत आहेत.
ऐसी शिकायतें आ रही हैं कि कुछ ड्राइवर महिलाओं को देखकर बस नहीं रोकते क्योंकि महिलाओं का सफ़र फ़्री है। इसे बिल्कुल बर्दाश्त नहीं किया जाएगा। इस बस ड्राइवर के ख़िलाफ़ सख़्त एक्शन लिया जा रहा है। pic.twitter.com/oqbzgMDoOB
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 18, 2023
महिलांसाठी बस मोफत असल्याने काही चालक महिलांना पाहून बस थांबवत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हे अजिबात सहन केले जाणार नाही. या बस चालकावर कडक कारवाई करण्यात येत आहे, असे केजरीवाल या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. याचाच विरोधाभास आपची सत्ता असलेल्या पंजाबच्या राज्यात पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने कानाखाली मारल्याबद्दल केजरीवाल यांच्यावर टीका केली जात आहे.