'ऑफेसट भागीदार म्हणजे काय राहुल गांधींना समजू नये हे अत्यंत वाईट'

या खरेदी कराराच्या किमतीबद्दलही न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती नेमण्याची काहीच गरज नाही.

Updated: Jan 2, 2019, 04:42 PM IST
'ऑफेसट भागीदार म्हणजे काय राहुल गांधींना समजू नये हे अत्यंत वाईट' title=

नवी दिल्ली - राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून बुधवारी लोकसभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केल्यानंतर अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्या कराराबद्दलच्या एकूण आकलनाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राफेल विमानाच्या किमतीबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण माहिती दिली असून, न्यायमूर्तीचेही त्याबद्दल समाधान झाले. पण काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठीच्या गरजांचे समाधान होऊ शकत नाही, असा टोमणा मारत अरुण जेटली यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

राफेल कथित ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रतिक्रिया

गेल्या काही महिन्यांपासून राफेलचा मुद्दा राहुल गांधींकडून सातत्याने उचलला जात आहे. याच मुद्द्यावरून 'चौकीदार चोर है' म्हणून मोदींवर टीकाही केली जात आहे. बुधवारी राफेल करारावरून लोकसभेमध्ये सविस्तर चर्चा झाली. या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी राफेल खरेदी कराराची प्रक्रिया, त्याची किंमत आणि एचएएलऐवजी अनिल अंबानी यांच्या कंपनीकडे हे काम देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला. पण अरुण जेटली यांनी हे सर्व मुद्दे फेटाळून लावले. ते म्हणाले, राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही. या खरेदी कराराच्या किमतीबद्दलही न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती नेमण्याची काहीच गरज नाही. ऑफसेट भागीदार म्हणजे काय हे काँग्रेसच्या अध्यक्षांना समजू नये, हे बघून मला अत्यंत वाईट वाटते. युपीए सरकारच्या काळात या शस्त्रसज्ज विमानांच्या खरेदीसाठी जी किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यापेक्षा २० टक्के कमी दराने आम्ही हे विमान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शस्त्रसज्ज नसलेल्या विमानांच्या किमती युपीए सरकारपेक्षा ९ टक्क्यांनी कमी आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

राफेल खरेदी व्यवहारावरुन गोव्याच्या एका मंत्र्यांची ऑडिओ क्लीप राहुल गांधी यांनी सभागृहात आणली होती. पण जोपर्यंत या क्लीपच्या सत्यतेची जबाबदारी राहुल गांधी घेत नाही, तोपर्यंत ती सभागृहात सादर न करण्याची सूचना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली. तसे करण्याची तयारी राहुल गांधी यांनी न दर्शविल्याने अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात त्यांच्यावर टीका केली. सत्य कायम नाकारण्याची काही लोकांची वृत्ती असते. राहुल गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, ते बघून संपूर्ण देशवासी नाराज आहेत. त्यांनीच आणलेल्या क्लीपची जबाबदारी स्वीकारण्यासही ते तयार नाहीत. एकेकाळी काँग्रेसकडे मोठा अभ्यास असलेले नेते होते. पण आज त्याच पक्षाकडे विमानांची सर्वसाधारण माहिती असणारा माणसेही नाहीत, याबद्दल जेटली यांनी खेद व्यक्त केला.