रघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

Updated: Nov 8, 2017, 05:22 PM IST
रघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?  title=

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी दिल्लीच्या सत्तेत असलेली आम आदमी पार्टी (आप) आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना उमेदवारी देऊ शकते. दिल्ली विधानसभेतल्या ७० पैकी ६६ जागा आपकडे आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या तिन्ही जागांवर आपचा विजय पक्का मानला जातोय.

राज्यसभेच्या उमेदवारांसाठी अरविंद केजरीवाल पक्षाबाहेरच्या बुद्धीजीवी उमेदवारांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आपकडून रघुराम राजन यांना राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे, आणि रघुराम राजन या ऑफरचा विचार करत असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

राज्यसभा खासदारकीसाठी पक्षाबाहेरच्यांना उमेदवारी द्यायचा निर्णय झाला आहे. समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना आपकडून उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती आपच्या बड्या नेत्यानं दिल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियानं केला आहे.

रघुराम राजन सध्या अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत. तीन वर्ष ते आरबीआयचे गव्हर्नर होते. गव्हर्नर म्हणून आणखी एक कार्यकाळासाठी रघुराम राजन इच्छुक होते, पण मोदी सरकारकडून त्यांना ऑफर देण्यात आली नाही.

पक्षाबाहेरच्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर आपमध्ये अंतर्गत कलह व्हायची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आमदार अमानतुल्ला खान यांचं निलंबन आपनं मागे घेतलं होतं. आपचे नेते कुमार विश्वास यांनी निलंबन मागे घ्यायच्या निर्णयाचा विरोध केला होता. माझ्या राज्यसभेमध्ये जाण्यात अडथळे निर्माण करण्यासाठी हे निलंबन मागे घेण्यात आल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता.

माणूस असल्यामुळे माझ्या काही इच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया कुमार विश्वास राज्यसभा खासदारकीच्या प्रश्नावर दिली होती. कुमार विश्वास आरएसएसचे एजंट असल्याची टीका अमानतुल्ला खान यांनी केली होती. यानंतर अमानतुल्ला यांचं निलंबन करण्यात आलं होतं पण आता हे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.