ढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी 'असे' बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व!

Sukh Sagar Success Story :  सुरेश पुजारी हे सध्याचे यशस्वी उद्योजक आहेत. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Pravin Dabholkar | Updated: Jun 22, 2024, 02:55 PM IST
ढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी 'असे' बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व! title=
Sukh Sagar Success Story

Sukh Sagar Success Story : आयुष्यात काहीतरी करायचा ठाम निर्णय घेतला तर अनेक अडचणींवर तुम्ही मात करु शकता. छोट्या गावात जन्मलेल्या अनेकांमध्ये आपल्या परिस्थितीबद्दल न्यूनगंड असतो. पण या परिस्थितीवर मात केलेल्यांना भविष्यात स्वत:चे विश्व निर्माण करतात.  गरिबीत जन्म घेतलेल्या अनेक तरुणांनी पुढे जाऊन स्वत:चे विश्व निर्माण केले. आज आपण अशीच एक कहाणी जाणून घेऊया. ही कहाणी आहे कर्नाटकातील एका छोट्या गावातून येऊन 22 रेस्टॉरंट्सचे मालक बनलेल्या सुरेश पुजारी यांची. सुरेश पुजारी हे सध्याचे यशस्वी उद्योजक आहेत. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला? जाणून घेऊया. 

सुरेश पुजारी यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप खडतर होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी काम करावे लागले. 10 वर्षाचे असताना त्यांनी मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांच्या गावात काम करुन पोट भरण्याचे फारसे पर्याय नव्हते. म्हणून ते मुंबईत आले.

4 रुपये पगाराची नोकरी 

सुरेश पुजारी यांच्यासाठी मुंबई हे नवे शहर होते. इथे पोहोचलो तर खरे पण सुरुवात कशाने करायची? याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. पण काहीही झाले तरी हार मानायची नाही, हे सुरेश यांनी ठरवले होते. कसेबसे त्यांना रेल्वे स्टेशनच्या शेजारी एका छोट्या ढाब्यावर नोकरी मिळाली. तिथे दिवसभर काम केल्याबद्दल त्यांना महिन्याला अवघा 4 रुपये इतका पगार मिळायचा. 

4 रुपये पगारावर सुरेश यांनी सलग दोन वर्षे काम केले. नंतर त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी त्यांना ज्यूसच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. इथेपण सुरेश यांचा पगार फारसा वाढला नाही. पण तिथल्या कामातील बारकावे त्यांनी शिकून घेतले.

दिवसाचे 18 तास काम आणि रात्री अभ्यास

सुरेश यांना काही दिवसातच कॅन्टीनमध्ये नोकरी मिळाली. त्यांचा पगार वाढून 6 रुपये झाला. शिक्षणाशिवाय प्रगती होणे अवघड आहे हे त्यांना समजले होते. यामुळे त्यांनी मेहनत घेणे वाढवले. सुरेश पुजारी दिवसाला 18-18 तास काम करायचे. यानंतर घरी येऊन अभ्यास करायचे. त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले. पण यापुढे शिक्षण त्यांना सुरु ठेवता आले नाही. गिरगाव चौपाटीजवळ त्यांनी पावभाजीचे छोटेसे हॉटेल उघडले.

जॉर्ज फर्नांडिस मित्र 

सुरेश पुजारी यांच्या रेस्तरॉंची चव उत्कृष्ट होती. चवीमुळे त्यांच्या हॉटेलची प्रसिद्धी होत गेली. तत्कालीन कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा पुजारींच्या हॉटेलमधील भाजी खाल्ली होती. त्यांना चव इतकी आवडली की ते पुन्हा पुन्हा तिथे येऊ लागले. जॉर्ज फर्नांडिस आणि सुरेश पुजारी यांची मैत्री झाली. त्याचं पाव-भाजीचं हॉटेल चांगलं सुरू होतं. पण त्यांना आपला व्यवसाय आणखी वाढवायचा होता.  काही वर्षांतच देशाच्या अनेक भागात त्यांनी हॉटेल सुरु केले. 

22 रेस्टॉरंट मालक

आजच्या घडीला 'सुख-सागर' रेस्तरॉंच्या भारतात 22 हून अधिक शाखा आहेत. त्यांचे रेस्तरॉं साऊथ इंडियन फूड, पावभाजी, पंजाबी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच ते आईस्क्रीम पार्लर, शॉपिंग मॉल आणि थ्री स्टार हॉटेलचे मालकदेखील आहेत. सुखसागर रेस्तरॉं भारतातच नव्हे तर मध्य पूर्व देशांमध्येही पोहोचले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या रेस्तरॉंमध्ये जेवण केले आहे.