लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नोएडा फ्लायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा या हाथरसला रवाना झाल्या आहेत. ते 'निर्भया'च्या कुटुंबाचीच भेट घेणार आहेत. दरम्यान हाथरसमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हाथरसच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत.
हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट । नोएडा फ्लायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन । मोठा पोलीस बंदोबस्त तैनात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी हाथरसला रवाना । निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेणार। हाथरसमध्ये कलम १४४ लागू#Hathras @ashish_jadhao pic.twitter.com/IqBrpxftwf
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 1, 2020
काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्या राज्यात पोलीस पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा तक्रार नोंदवून घेत नाही. मात्र, तिच्या निधनानंतर तात्काळ अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतात. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेवतात, हे कोणते राज्य. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आज देशात महिला सुरक्षित नाहीत. भाजपचा कोणताही नेता आता आवाज उठवत नाही. गरिबांवर अत्याचार होत आहेत. याला भाजपचेच सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. असे असताना राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना हाथरसमध्ये येवू दिले जात नाही. कुटुंबांचे म्हणणे काय आहे, तेही जाणून घेतले पाहिजे. मात्र, भाजप सरकार तेही करु देत नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
Delhi: Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra leave for Hathras in Uttar Pradesh where a 19-year-old woman was gang-raped. pic.twitter.com/9tePa8NLrg
— ANI (@ANI) October 1, 2020
दरम्यान, हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केलीय. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आलीय. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधल्या दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. ५ ते ६ जणांनी या तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय. रात्रीतूनच या देखील तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मुलीचे पाय आणि कंबरेचं हाड मोडण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.