राहुल गांधींना ट्रोल करायचा भाजपचा प्रयत्न फसला

राहुल गांधींनी 'वंदे मातरम'चा अपमान केला

Updated: Aug 12, 2018, 08:52 AM IST
राहुल गांधींना ट्रोल करायचा भाजपचा प्रयत्न फसला title=

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका कथित व्हीडिओवरुन सध्या भाजप व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कर्नाटकमधील एक व्हीडिओ शेअर केला होता. यामध्ये राहुल गांधींनी राष्ट्रीय गीत असणाऱ्या वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप पात्रा यांनी केला. राहुल यांच्या कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गायले जाणार होते. मात्र, राहुल गांधी व्यासपीठावरील नेत्यांना गीताच्या मोजक्याच ओळी गा, असे सांगताना ऐकू येत आहे. यावरुन सांबित पात्रा आणि भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध रान उठवण्याचा प्रयत्न केला. 

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी तावातावाने राहुल यांच्याविरुद्ध प्रतिक्रियाही दिली. राहुल गांधींची ही मुजोरी धक्कादायक आहे. त्यांना संपूर्ण देश आपल्या मालकीचा आहे, असे वाटते. वंदे मातरम या गीतात बदल करावेत का, असा सवाल सांबित पात्रांनी ट्विटरवरुन उपस्थित केला. 

मात्र, यानंतर काहीवेळातच काँग्रेसकडून हा व्हीडिओ बनावट असल्याचे सांगण्यात आले. योगायोग म्हणजे एरवी कधीही माघार न घेणाऱ्या सांबित पात्रांनीही हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गुपचूप हटवला. मात्र, एकूणच सगळा प्रकार पाहता सांबित पात्रा यांचा डाव त्यांच्यावरच उलटल्याचे दिसते.