राहुल गांधींची पायी चालत निघालेल्या मजुरांशी 'मन की बात'

काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले.

Updated: May 17, 2020, 04:59 PM IST
राहुल गांधींची पायी चालत निघालेल्या मजुरांशी 'मन की बात' title=

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले. यानंतर राहुल गांधी यांनी स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला. या मजुरांनी आपल्या व्यथा मोकळेपणाने राहुल यांच्यासमोर मांडल्या. 

या चर्चेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी कारची सोय करून दिली. हे मजूर हरियाणाच्या झाशी येथील असल्याचे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी आपल्याला वाहनाची सोय करून दिली. तसे खाणे, पाणी आणि मास्कही दिला. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया एका मजुराने व्यक्त केली. 

गेल्या काही दिवसांमध्ये उपासमारीमुळे देशाच्या शहरी भागांतील लाखो मजुरांनी ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे.  या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. तसेच अनेक कामगारांकडे तिकीटाचे पैसे नसल्याने ते नाईलाजाने गावी पायी चालत निघाले आहेत. केंद्र सरकारने या मजुरांसाठी काही दिवसांपूर्वी आर्थिक पॅकेजही जाहीर केले होते. मात्र, या पॅकेजचा मजुरांना फायदा होणार नाही.  सरकारने मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती.