मुंबई : दिवाळीआधी मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुक केलं तर ग्राहकांना कमी पैसे द्यावे लागतील, असं वक्तव्य रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे.
देशातली जवळपास ३० टक्के रेल्वे तिकीटं ऑनलाईन बूक होतात. केंद्र सरकार मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच एमडीआर शुल्क हटवण्याचा विचार करत आहे. हे चार्ज आयआरसीटीसी ऑनलाईन तिकीट बूकिंग केल्यावर घेते. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनं तिकीट बुकिंग केलं तर एमडीआर चार्ज द्यावे लागतात. हे चार्ज रद्द झाल्यावर ग्राहकांना तिकीटासाठी कमी पैसे द्यावे लागतील.
एमडीआर रद्द करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि बँकांमध्ये चर्चा सुरु आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर रेल्वेमध्ये येत्या काही वर्षांमध्ये १० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन गोयल यांनी दिलं आहे. तसंच रेल्वे रुळांच्या आधुनिकीकरणासाठीही लवकरच टेंडर काढलं जाईल, असं रेल्वेमंत्री म्हणाले.
दिवाळीनिमित्त रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणे यावर्षीही जास्त ट्रेन चालवण्यात येणार आहेत. यावर्षी ७ हजारापर्यंत जास्त ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा मानस आहे.