रेल्वेचा मोठा निर्णयः राजधानी, शताब्दीसह 'या' गाड्या लवकरच रूळावर धावतील

प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ३९२ 'फेस्टिव्हल विशेष गाड्या' चालवण्याचा निर्णय घेतला आहे.    

Updated: Oct 15, 2020, 05:32 PM IST
रेल्वेचा मोठा निर्णयः राजधानी, शताब्दीसह 'या' गाड्या लवकरच रूळावर धावतील  title=

नवी दिल्ली : देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. देशात रोज नव्या कोरोना रूग्णांची नोंद होत असली तरी कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे दिलासा मिळत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व लोकल गाड्या आणि एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु लॉकडाऊन उठवल्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून काही प्रमाणात  लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या 'विशेष ट्रेन' म्हणून सुरू करण्यात आल्या. 

आता सध्या भरतात सर्वत्र मोठ्या सणांची चाहूल लागली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ३९२ 'फेस्टिव्हल विशेष गाड्या' चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय गाड्यांची यादी संबंधित झोनला पाठवण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राजधानी, शताब्दीसह तेजस आणि हमसफर गाड्या देखील पुन्हा रेल्वे रुळावर धावणार आहेत. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत राजधानी, शताब्दी, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. त्यामुळे आता रूळावर ४१६ विशेष गाड्या धावणार आहेत. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्व ट्रेन 'विशेष गाड्या' म्हणून धावणार आहेत. सध्या रेल्वे ६८२ विशेष गाड्या आणि २० क्लोन गाड्या चालवत आहेत. याशिवाय २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ४१६ अधिक विशष गाड्या चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. 

दरम्यान, सणांच्या काळात सर्वच जण आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. याच पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये प्रवाशांची अधिक गर्दी होवू नये आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळावा यासाठी रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.