अनेकदा रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेक बातम्यांमधून वाचले असेल. अॅम्ब्युलन्स (ambulance) वेळेत न मिळाल्यानेही अनेकदा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पण राजस्थानमध्ये रुग्णवाहिका (rajasthan patient dies ambulance) मिळूनही एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या बांसवाडा (Banswara district) येथे रुग्णवाहिकेचे डिझेल (diesel) वाटेत संपल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाला वेळेत रुग्णालयात न पोहोचवल्याने त्याचा मृत्यू झालाय. डिझेल संपल्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेला धक्का मारत रूग्णालयापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच रुग्णाचा मृत्यू झाला होता.
राजस्थानमध्ये एक व्यक्ती भानपूर येथील आपल्या मुलीच्या सासरच्या घरी गेली होती. तिथे अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर 108 वर फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. पण वाटेतच डिझेल संपल्याने रुग्णवाहिका बंद पडली. यानंतर चालकाने 500 रुपये देऊन डिझेल आणायला सांगितले असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यादरम्यान रुग्णवाहिका रस्त्यावरच थांबून होती. बांसवाडा येथून डिझेल घेऊन नातेवाईक परतले. पण डिझेल ओतूनही रुग्णवाहिका सुरू झाली नाही. यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने ढकलण्यास सुरुवात केली. चालकानेही रुग्णवाहिका सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती सुरु होऊ शकली नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार, रुग्णालयाचे चालकाने दुसरी रुग्णवाहिका बोलवली. त्यानंतर रुग्णाला रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचले. बांसवाराचे मुख्य वैद्यकीय अधिकारीएचएल तबियार यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. "आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटून निष्काळजीपणा शोधून काढू.108 क्रमांकाची रुग्णवाहिका खासगी एजन्सीद्वारे चालवली जाते. रुग्णवाहिकेच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे," असे तबियार यांनी सांगितले.
दुसरीकडे, राजस्थानचे मंत्री पीएस खचरियावास यांनी या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, "जर रुग्णवाहिकेतील डिझेल संपले तर ते यंत्रणेचे अपयश नाही तर व्यवस्थापनाचे अपयश आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांवर सरकार कठोर कारवाई करेल."