Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Metro Brands मध्ये तुफान तेजी

  फुटवेअर रिटेल कंपनी मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये सोमवारी कमालीची तेजी नोंदवली गेली. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीचे शेअर तब्बल 20 टक्क्यांनी वाढून 609 रुपयांवर पोहोचले.

Updated: Jan 18, 2022, 09:37 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Metro Brands मध्ये तुफान तेजी title=

मुंबई : फुटवेअर रिटेल कंपनी मेट्रो ब्रँड्सच्या ( Metro Brands) शेअर्समध्ये सोमवारी कमालीची तेजी नोंदवली गेली. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीचे शेअर तब्बल 20 टक्क्यांनी वाढून 609 रुपयांवर पोहोचले.

कंपनीचे तिमाही निकाल जारी झाल्यानंतर शेअर आतापर्यंतच्या उच्चांकीवर आहे.  शुक्रवारी (14 जानेवारी) शेअर 508 रुपयांवर बंद झाला. सोमवारी शेअर 602 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल खूप मजबूत आहेत, ज्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये शॉर्टटर्म तसेच लॉंगटर्मसाठी गुंतवणूक केली आहे.

कंपनीचा नफा
डिसेंबर तिमाहीत मेट्रो ब्रँड्सचा नफा वार्षिक 55 टक्क्यांनी वाढून 100.85 कोटी रुपये झाला आहे. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 65.22 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा एकूण महसूल वार्षिक 59.02 टक्क्यांनी वाढून 483.77 कोटी झाला आहे. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 304.21 कोटी रुपये होता.

ही कंपनी शेअर मार्केटमध्ये 22 डिसेंबर 2021 रोजी लिस्ट झाली होती. त्यावेळी कंपनीचा शेअर 436 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट झाला होता, तर इश्यू किंमत 500 रुपये होती. या अर्थाने, ज्यांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना लिस्टिंगमध्ये 13 टक्के किंवा प्रति शेअर 64 रुपये तोटा झाला होता.

परंतू आज शेअर 600 रुपयांच्या वर व्यवहार करीत असल्याने गुंतवणूकदार पुन्हा नफ्यात आले आहेत.