मुंबई : भारतीय रिजर्व्ह बँकेने रेपो रेट 35 बेसिस पॉईंटने कमी केला आहे. ज्यामुळे येणाऱ्या दिवसात कर्ज आणखी स्वस्त होणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट आता 5.40 टक्के झाला आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकेकडून होम लोन आणि कार लोन कमी होण्याची शक्यता आहे. रेपो रेट 35 बेसिस पॉईंटने कमी करण्याचा निर्णय आज आरबीआयने जाहीर केला.
आरबीआयच्या 6 सदस्याच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी (MPC)चे 2 सदस्य चेतन घटे आणि पामी दुआ रेपो रेट कमी करण्याच्या बाजुने नव्हते. 0.35 ऐवजी 0.25 टक्के कमी रेपो रेट कमी करण्याची मागणी त्यांनी केली होती. पण रविंद्र ढोलकिया, देवब्रत पात्रा, बिभु प्रसाद आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 0.35 टक्के रेपो रेट कमी करण्याचा निर्णयाचं समर्थन केलं.
केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा अनुमान 7 टक्क्यांवरुन 6.9 टक्के केला आहे. केंद्रीय बँकेने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकार 5 ट्रिलियन डॉलरची इकोनॉमीचं लक्ष्य गाठण्यासाठी ८ टक्के जीडीपी ग्रोथचा प्रयत्न करत आहे. याआधी जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने 7.2 टक्क्यांवरुन 7.0 टक्के ग्रोथची शक्यता वर्तवली होती. रिजर्व्ह बँकेच्या मते, आर्थिक वर्ष 2020 मध्ये पहिल्या सहा महिन्यात 5.8-6.6 टक्के तर दुसऱ्या सहा महिन्यात 7.3-7.5 टक्के ग्रोथची शक्यता वर्तवली आहे.
ऑगस्टमध्ये लागोपाठ चौथ्यांदा आरबीआयने रेपो रेट कमी केले आहेत. रिजर्व्ह बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर चौथ्यांदा रेपो रेट कमी करण्यात आले. 2018 च्या डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास हे नवे गर्व्हनर बनले. त्यानंतर आतापर्यंत ४ वेळा आरबीआयची बैठक झाली आहे.
होम लोन, कार लोन असलेल्या लोकांना याचा फायदा होणार आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांकडूनही व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. याआधी रेपो रेट कमी केल्यामुळे बँकांनी व्याजदर कमी केले नव्हते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांनी याचा फाय़दा ग्राहकांना देण्याचा आग्रह बँकांकडे केला होता.