न्यायालयाच्या आदेशानंतरही रिचा भारतीचा कुराण वाटायला नकार

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या रिचा भारतीने कुराण वाटायला नकार दिला आहे.

Updated: Jul 16, 2019, 11:00 PM IST
न्यायालयाच्या आदेशानंतरही रिचा भारतीचा कुराण वाटायला नकार title=

रांची : सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या रिचा भारतीने कुराण वाटायला नकार दिला आहे. न्यायालयाने रिचा भारतीला शिक्षा सुनावताना धार्मिक काम करायची शिक्षा दिली होती. यानुसार रिचाला कुराणाच्या ५ प्रती वाटण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यातली एक प्रत आज अंजुमन इस्लामियाला द्यायची होती. उरलेल्या ४ प्रती या पुढच्या १५ दिवसांमध्ये द्यायच्या आहेत. पण न्यायालयाच्या या शिक्षेमुळे रिचा आणि तिचं कुटुंब नाराज आहे. मला कोणत्याही धर्माचं वावडं नाही, पण मी कुराण वाटणार नाही, असं रिचा म्हणाली.

'मला कुराण वाटायचं नाही, कारण आज कुराण वाटायला सांगितलं जात आहे, उद्या इस्लाम धर्म स्वीकार करायला सांगतलं जाईल. इतर समाजाची लोकं सोशल मीडियावर बोलतात तेव्हा त्यांना हनुमान चालिसा आणि मंदिरात जायला सांगतात का?' असा सवाल रिचाने विचारला आहे.

'आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, पण हा निर्णय योग्य नाही. आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. आम्ही वरच्या न्यायालयात जाऊ,' असं रिचाच्या कुटुंबियांनी सांगितलं.

झारखंडची राजधानी रांचीपासून २० किमी लांब असलेल्या पिठोरियामध्ये रिचा भारती राहते. रिचा ही बीकॉमची विद्यार्थिनी आहे. रिचाने तिच्या फेसबूक अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. यानंतर धार्मिक उन्माद पसरवण्याचा आरोप करत रिचावर पिठोरिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. १२ जुलैरोजी संध्याकाळी ५ वाजता रिचाला पोलिसांनी अटक केली आणि ९ वाजता जेलमध्ये पाठवलं. १५ जुलैला रिचाला जामीन मिळाला. रविवारी हिंदू संघटनांनी याविरोधात मोर्चा काढला.

जामीन मिळाल्यानंतर रिचा भारतीने झी मीडियाशी संवाद साधला. 'मी अल्लाह आणि राम दोघांना मानते. कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी मी पोस्ट केली नव्हती. पण न्यायालयाने सांगितेलल्या कुराणाच्या ५ प्रती मी वाटणार नाही. आज कुराण वाटायला सांगत आहेत. उद्या आणखी काही वाटायला सांगतील. दुसऱ्या धर्माचे लोकं जेव्हा काही पोस्ट करतात तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,' अशी प्रतिक्रिया रिचाने दिली.

'न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. लेखी स्वरुपामध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही. जर या गोष्टी लेखी स्वरुपात आल्या तर आम्ही आमच्या वकिलांशी संपर्क करू. उच्च न्यायालयात दाद मागू. कोणताही धर्म चुकीचा नसतो. मी फक्त फेसबूक पोस्ट शेयर केली,' असं वक्तव्य रिचाने केलं.

महाधिवक्ता अजित कुमार यांनी न्यायालयाचा निर्णय चुकीचा नाही, असं म्हटलं आहे. जे लोकं विरोध करत आहेत, त्यांना निर्णय समजून घ्यायची गरज आहे. एकोपा कायम ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. आपला देश आणि कायदा एकोपा ठेवायला सांगतो. कोणीही याच्याविरोधात जाऊ शकत नाही, असं अजित कुमार म्हणाले.