Robert Vadra On Kejriwal Arrest: क्राँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या अटकेवर राजकीय प्रतिक्रिया नोंदवली आहे. मात्र त्यांनी नोंदवलेली प्रतिक्रिया ही काँग्रेसच्या भूमिकेविरोधात असल्याची चर्चा असून जावयानेच काँग्रेसला घरचा आहेर दिल्याचं बोललं जात आहे.
'भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेत आलं आहे तेव्हा त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला,' असा टोला वाड्रा यांनी लगावला. 'मी सुद्धा हे सारं काही सहन केलं आहे. माझ्यावरही बिनबुडाचे आरोप लावण्यात आले. मला जे प्रश्न विचारण्यात आले त्यामधून काहीच हाती लागणार नव्हतं. त्या प्रश्नांमध्ये फारसा दम नव्हता. मात्र जेवढ्या वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं त्या त्यावेळी मी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच चौकशीसाठी हजर राहिलो होतो. मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात बोलायचं झाल्यास, माझ्या मते त्यांनी वेळेआधी तपासासाठी जायला हवं होतं. त्यांना 9 वेळा बोलवण्याची वेळ यायला नको होती,' असं वाड्रा म्हणाले आहेत.
'केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांबरोबर जे घडलं त्यामधून त्यांनी अनेकदा बोलावल्यानंतरही न जाण्याचा निर्णय घेतला असावा,' अशी शंकाही वाड्रा यांनी व्यक्त केली आहे. 'आता केजरीवाल चौकशासाठी तयार झाले तर त्यांना थेट अटक करण्यात आली,' असंही वाड्रा यांनी नमूद केलं. 'त्यांनी काही चुकीचं केलं नसेल तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही. जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर द्यायला हवी आणि निश्चिंत राहायला हवं,' असं वाड्रा म्हणाले.
वाड्रा यांची ही भूमिका म्हणजे काँग्रेसला घरचा आहेर असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. 'इंडिया' आघाडी म्हणून सर्व नेत्यांनी एकजूट दाखवलेली असतानाच आता वाड्रांच्या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकते अशी शक्यात आहे.
नक्की वाचा >> '..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'
प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि विरोधकांची आघाडी कोणालाही घाबरत नाही. ते पुढे जात राहणार, असा विश्वास वाड्रा यांनी व्यक्त केला. हे सारं काही सहन करत ते पुढे वाटचाल करत राहतील आणि सर्वसामान्य लोक, शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करतील. लोकांच्या हितासाठी ते लढत राहतील, असा विश्वास वाड्रा यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका! ED ला फटकारत म्हणाले, 'ईडीने इमानदारीने...'
काँग्रेसची बँक खाती निवडणुकीच्या तोंडावर गोठवल्यासंदर्भात बोलताना वाड्रा यांनी ही त्यांची कार्यपद्धती आहे, असा टोला भाजपाचा थेट उल्लेख न करता लगावला.