उद्योजक होण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज नाकारलं, दोन वेळा अपयशी झाले; पण आज 150 कोटींच्या कंपनीचे मालक

रोहित मंगलिक (Rohit Mangalik) यांनी उद्योजक होण्याचं आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज असणारी कॉर्पोरेट नोकरी सोडली. नोकरी सोडणं हा त्यांच्यासाठी फार सोपा निर्णय नव्हता. आपला स्टार्टअप सुरु केल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण आज ते जगातील टॉप उद्योजकांच्या यादीत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 24, 2023, 05:40 PM IST
उद्योजक होण्यासाठी 42 लाखांचं पॅकेज नाकारलं, दोन वेळा अपयशी झाले; पण आज 150 कोटींच्या कंपनीचे मालक title=

आयुष्यात यश मिळवायचं असेल तर इच्छाशक्ती आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असली पाहिजे. आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना, रोहित मंगलिक यांनी मात्र धाडसी निर्णय घेतला होता. रोहित मंगलिक यांनी उद्योजक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली. त्यावेळी ते वर्षाला 42 लाख रुपये कमावत होते. पण रोहित मंगलिक यांनी आपल्या उद्योजक होण्याच्या मार्गावर प्रवास करण्याचं ठरवलं. 

रोहित मंगलिक यांच्यासाठी नोकरी सोडणं हा फार सोपा निर्णय नव्हता. आपला स्टार्टअप सुरु केल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांचा, अडचणींचा सामना करावा लागला. पण आज ते जगातील टॉप उद्योजकांच्या यादीत आहेत. 

सुरुवातीची वर्षं 

रोहित मांगलिक यांनी 2012 मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) पदवी प्राप्त केली. अनेक प्रमुख IT कंपन्यांसाठी काम करत त्यांनी भविष्यात लागणारा अनुभव प्राप्त केला. 2017 मध्ये मात्र त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि कॉर्पोरेट कारकीर्दीला रामराम ठोकला. यानंतर त्यांनी फारुखाबादमधील आपल्या मूळ गोष्टींकडे परतण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 

रोहित यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, कॉर्पोरेट वातावरणामुळे त्यांना फारच मर्यादित राहत असल्याचं वाटत होतं. याच काळात त्यांना माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. अब्दुल कलाम यांनी त्या कार्यक्रमात एक सल्ला दिला होता. वैयक्तिक फायद्यावर नाही तर देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्या असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचा रोहित मंगलिक यांच्यावर मोठा परिणाम झाला. यामुळे रोहित यांची उद्योजक होण्याची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा जागी झाली. 

नोकरी सोडल्यानंतर रोहित मांगलिक यांनी सात कर्मचाऱ्यांच्या टीमसह करिअर समुपदेशन सेवा सुरु करत उद्योजक होण्यााच प्रवास सुरू केला. यादरम्यान त्यांना वेगवेगळ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषत: लहान शहरात आणि सुरुवातीच्या काळात त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारपुरम, लखनौ येथे कार्यालय सुरू केले आणि आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले. पण त्यांच्यासमोरची आव्हानं वाढतच होती. 

2020 मध्ये स्टार्टअपला सुरुवात

2020 मध्ये, रोहित मंगलिक यांनी 'EduGorilla' या स्टार्टअपचा पाया घातला. तीन वर्षांत, या स्टार्टअपने जागतिक शिक्षण क्षेत्रातील टॉप 10 कंपन्यांमध्ये स्थान मिळवलं. सध्या, EduGorilla मध्ये 300 पेक्षा जास्त कर्मचारी अशून 100 दशलक्ष रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. कंपनीच्या उल्लेखनीय यशामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकही मिळत आहे. 

अपयशातून शिकवण

रोहित मंगलिक यांना दोन वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं. पण यातून त्यांनी शिकवण घेतली. मध्यवर्ती परीक्षा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने येणाऱ्या अडचणी त्यांनी ओळखल्या. ही गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2020 मध्ये EduGorilla अॅप आणलं. हे अॅप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अचूक माहिती देईल अशा प्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे. 

रोहित यांनी या अॅपसाठी विविध कोचिंग संस्थांना आपल्याशी जोडलं. त्यांना याच्या फायद्याची माहिती दिली. दरम्यान टीमच्या प्रयत्नांमुळे कंपनी आता देशभरातील 3,000 हून अधिक संस्थांसोबत भागीदारी करत आहे, सध्या कंपनीच्या अभ्यासक्रमांमध्ये 70 हजारांहूनन अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.