Mumbai Indians Rohit Sharma : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला 14 सामन्यात फक्त 4 सामने जिंकता आल्याने मुंबईचा संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला. अखेरच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) लखनऊकडून मात खावी लागली अन् शेवट देखील गोड करता आला नाही. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा 10 सामने गमावण्याचा नकोसा पराक्रम केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला अनेक सोपी सामने देखील गमवावे लागले, त्यामुळे आता मुंबई इंडियन्समध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळतंय. तर दुसरीकडे आता माजी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर मुंबई इंडियन्सचे कोच मार्क ब्राउचर (Mark Boucher) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
रोहित शर्माला कालचा सामना मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना होता, असं बोललं जातं होतं. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर आणि इतर खेळाडूंनी देखील रोहितला तुम्ही मुंबईकडून अखेरचा सामना खेळताना पाहताय, असं ट्विट केलं होतं. अशातच आता जेव्हा मुंबईचे कोच मार्क ब्राउचर यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी मोठं वक्तव्य केलं.
काय म्हणाले मार्क ब्राउचर?
मला विचाराल तर मी सांगेल की, तो त्याच्या नशिबाचा मालक आहे. पुढच्या हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यात काय होईल? याची कोणालाही खात्री नाही, असं मार्क ब्राउचर यांनी म्हटलं आहे. रोहित शर्मासाठी हा हंगाम दोन भागात राहिला आहे. सुरूवातीच्या सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या. त्याची फलंदाजीमध्ये लय दिसत होती. मात्र, दुसऱ्या हंगामात त्याला किंचित अपयश आलं. माझी काल रात्री रोहित शर्माशी चर्चा झाली. आम्ही यंदाच्या हंगामाचा आढावा घेतला. बोलताना मी त्याला विचारलं.. आता पुढे काय? तेव्हा रोहित म्हणाला 'वर्ल्ड कप'
दरम्यान, रोहित शर्माने यंदाच्या हंगामात धुंवाधार फलंदाजी करत 419 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक देखील ठोकलंय. तर 1 अर्धशतक देखील त्याच्या नावावर आहे. रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रोहित शर्मा वगळता इतर कोणत्याही खेळाडूला उत्तम फलंदाजी करता आली नाही. कॅप्टन हार्दिक पांड्या तर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये देखील फेल ठरल्याचं दिसून आलं.
मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामीतल संपूर्ण संघ - रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (C), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.