मुंबई : चालू वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती मजबूत होतेय... आज रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत १९ पैसे वधारून ६९ रुपये ९५ पैशांवर पोहचली. बँका आणि निर्यातदारांनी मोठ्या प्रमाणात डॉलर बाजारात आणल्यामुळे रुपया वधारल्याचं चलन बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७० रुपये १४ पैशांवर येऊन थांबवला होता. आज सकाळीही बाजार उघडल्यावर सत्तरीचा स्तर ओलांडून मजबूत होण्याचा सिलसिला कायम ठेवला.
दरम्यान, सलग पाच दिवस पेट्रोल डिझेलचे भाव कोसळल्यावर आज देशातल्या प्रमुख पाच शहरात दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल सध्या या वर्षभरातल्या सर्वाधिक नीच्चांकी पातळीवर आहे. मुंबईत पेट्रोल ७५.४१ रूपये दराने विकलं जातंय. तर डिझेल ६६.७९ रूपये दराने विकलं जातंय. या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती चांगल्याच कोसळल्या आहेत. ऑक्टोबरपासून कच्चा तेलाच्या किंमतीत तब्बल ४० टक्के घसरण नोंदवली गेलीय. त्यातच रूपयाही डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असल्याने इंधनाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे.