Russia And Ukraine war | युक्रेन-रशिया युद्धामुळे तुमचं बजेट कसं बिघडू शकतं?

Russia-Ukraine War : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. रशियन सैन्य युक्रेनच्या हद्दीत घुसले. यासोबतच रशियाने क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांच्या मदतीने हल्ला केला.

Updated: Feb 25, 2022, 10:42 AM IST
Russia And Ukraine war | युक्रेन-रशिया युद्धामुळे तुमचं बजेट कसं बिघडू शकतं? title=

मुंबई : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. रशियन सैन्य युक्रेनच्या हद्दीत घुसले. यासोबतच रशियाने क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांच्या मदतीने हल्ला केला. या युद्धामुळे गेल्या 24 तासांत आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अनेक बदल झाले. रशियाच्या या निर्णयामुळे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी या देशांनी रशियावर मर्यादित निर्बंध लादले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेले संकट आणखी काही दिवस असेच चालू राहण्याची भीती आहे. पण भारतात राहणाऱ्या लोकांवर या युद्धाचा काही परिणाम होईल की नाही? याबाबत जाणून घेऊ ...

भारताचे दोन्ही देशांशी संबंध

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर काय परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी प्रथम या दोन देशांशी भारताचे संबंध कसे आहेत हे जाणून घेतले पाहिजे. भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी व्यापारी संबंध आहेत. तसेच या दोन्ही देशांमध्ये भारतीय नागरिक राहतात. बहुतेक विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत.

रशियामधील विद्यार्थ्यांसह, नोकरदार लोक देखील आहेत. रशियातील भारतीय दूतावासानुसार, रशियामध्ये सुमारे 14,000 भारतीय राहतात. त्यात सुमारे पाच हजार विद्यार्थी आहेत. तसेच 500 व्यावसायिक आहेत. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. येथे सुमारे 18 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

तेलाच्या किमती वधारल्या

या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही थेट व्यवहारात कोणताही फरक पडणार नसल्याचे मान्य केले आहे. पण, जागतिक तणावामुळे तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरवर पोहोचल्या आहेत.

वाढत्या किमतीचा संपूर्ण जगावर परिणाम 

तेलाच्या किमतीत वाढ फक्त भारतातच होईल असे नाही. त्याचा परिणाम जगभर दिसून येईल. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. यातील बहुतांश सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आयात केले जाते. याशिवाय भारत इराण, इराक, ओमान, कुवेत, रशिया येथूनही तेल आयात केले जाते.

अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. येथे सुमारे 16-18 टक्के तेलाचे उत्पादन होते. त्याच वेळी रशिया आणि सौदी अरेबिया 12-12 टक्के उत्पादन करतात. 3 पैकी 2 मोठे देश युद्धसदृश परिस्थितीत समोरासमोर आले तर जगभरातील तेल पुरवठ्यावर परिणाम होईल. यामुळेच तेलाच्या किमती 8 वर्षांच्या उच्चांकावर आहेत.

भारतात महागाई वाढेल

महागाईचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर होतो. पेट्रोल-डिझेलची किंमत लगेच वाढण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही थेट परिणाम होणार आहे. ऊर्जातज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांच्या मते, दीड महिन्यांपासून पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. पण, दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाने 15-17 टक्क्यांची उसळी घेतली आहे.

या गोष्टींचा भारतावर होऊ शकतो परिणाम

युक्रेन जगातील सर्वात मोठा शुद्ध सूर्यफूल खाद्यतेल निर्यातदार देश आहे. युक्रेननंतर, या पुरवठ्यात रशियाचा क्रमांक लागतो. दोन देशांमधील युद्ध दीर्घकाळ चालले तर घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूर्यफूल तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

युक्रेनमधून भारतात खतांचा पुरवठा होतो. तो महागण्याची शक्यता आहे.  तसेच युक्रेनमधून येणाऱ्या मोती, मौल्यवान खडे, धातू रशियातून आयात केले जातात. स्मार्टफोन आणि संगणक बनवण्यासाठी अनेक धातूंचा वापर केला जातो.