Russia-Ukrain Row : सुरतमधील हिरे बाजारात (Surat Diamond Market) काम करणाऱ्या जवळपास अडीच लाख कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. सुरतमधील हिरे पॉलिशिंग आणि कटिंग युनिटमधल्या या कारागीरांना 16 तारखेपासून 15 दिवसांच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. या काळात त्यांना पगार देण्यात येणार नाही.
तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून त्यांना आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टीही देण्यात आली आहे. आणि याचं कारण आहे अलरोसा ही कंपनी.
अलरोसा ही जगातील सर्वात मोठी हिऱ्याचं उत्खनन करणारी कंपनी, अलरोसा कंपनीत रशियन सरकारची मोठी भागीदारी आहे. मात्र रशिया-युकेन युध्दामुळे (Russia-Ukraine War) अमेरिकेने या कंपनीवर निर्बंध टाकले असल्यानं कंपनीकडून केला जाणारा कच्च्या हिऱ्यांचा 30 टक्के पुरवठा कमी झाला आहे.
अमेरिकेने लावलेल्या बंदीमुळे भारतीय हिरे निर्यांतदारांवर परिणाम झाला असून त्यांना या कंपनीकडून हिऱ्यांची खरेदी करता येत नाही. आणि पैलू पाडण्यासाठी पैसे गुंतवण्याची जोखीम भारतीय हिरे व्यावसायिक उचलू शकत नाहीत. परिणामी तब्बल 10 लाख लोकांना रोजगार देणाऱ्या या हिरे व्यवसायाला युध्दाचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे