Russia-Ukraine war | रशिया युक्रेन युद्धाचा थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम; दोन वेळचं 'जेवण' महाग

Russia-Ukraine war:गेल्या आठवड्याभरात जागतिक कमोडीटी बाजारामध्ये भाव वाढ झाली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे गहू, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, मका, लाकूड यांचे दर गगनाला भिडले आहेत.

Updated: Mar 5, 2022, 03:18 PM IST
Russia-Ukraine war | रशिया युक्रेन युद्धाचा थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम; दोन वेळचं 'जेवण' महाग title=

नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरात जागतिक कमोडीटी बाजारामध्ये भाव वाढ झाली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे गहू, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, मका, लाकूड यांचे दर गगनाला भिडले आहेत. आठवड्याभरात गव्हाच्या किमतीत 40 टक्के ,कच्च्या तेलाचे भाव 26 ते 30 टक्के, नैसर्गिक गॅस 22 टक्के , मका 14 टक्के , लाकूड 10 टक्के महाग झाले आहेत. युद्ध आणखी काही दिवस चालले तर जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे गंभीर परिणाम होणार आहे. 

चीन आणि भारतानंतर रशिया हा गव्हाचा सर्वात मोठा उत्पादक देश 

रशिया आणि युक्रेनमधील गव्हाच्या निर्यातीवरही परिणाम झाला असून आगामी काळात गव्हाच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीन आणि भारतानंतर रशिया हा गव्हाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. गहू निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युक्रेन पाचव्या क्रमांकावर आहे.

भारतासह जगभरात गव्हाचे वाढले भाव 

भारतात 21-22 या वर्षात गव्हाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज सरकारने जाहीर केला आहे. मात्र जागतिक स्तरावर त्याची वाढती किंमत पाहून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही त्याची किंमत वाढली आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गव्हाचा पुरवठा धोक्यात

APEDA नुसार, भारत प्रामुख्याने नेपाळ, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि येमेनमध्ये गहू निर्यात करतो. अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गव्हाचा जागतिक पुरवठा धोक्यात आला आहे

 त्यामुळे आता अन्य देशांनाही गहू निर्यात करण्यासाठी APEDA संबंधित देश आणि निर्यातदारांशी चर्चा करत आहे. जागतिक स्तरावर गव्हाच्या किमती दहा वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.