Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानावरुन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकी मंत्र्याला सुनावलं

S Jaishankar Hits Back Mike Pompeo: अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री Sushma Swaraj यांच्याबद्दल आपल्या पुस्तकात वादग्रस्त विधान केलं असून या विधानावरुन एस. जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Jan 25, 2023, 06:30 PM IST
Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानावरुन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकी मंत्र्याला सुनावलं title=
S Jaishankar Hits Back Mike Pompeo

Jaishankar Hits Back Mike Pompeo Over Sushma Swaraj Comment: अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या पुस्तकामध्ये भारताच्या दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधानं केली आहेत. माइक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी आपल्या 'नेव्हर इव्हन अ‍ॅन इंच: फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' (Never Give an Inch: Fighting for the America I Love) या पुस्तकामध्ये सुषमा स्वराज या कधीच महत्त्वाच्या राजकीय खेळाडूंपैकी एक नव्हत्या असं म्हटलं आहे.

जयशंकर काय म्हणाले?

भारताचे विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सुषमा स्वराज यांच्यासंदर्भात पॉम्पिओ यांनी केलेल्या विधानावरुन तिव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. जयशंकर यांनी पॉम्पिओ यांच्या पुस्तकामध्ये सुषमा स्वराज यांच्यासाठी वापरण्यात आलेले शब्द हे अपमानास्पद आहेत. मी कठोर शब्दांमध्ये याची निंदा करतो, असं म्हटलं आहे. मात्र पॉम्पिओ यांच्या पुस्तकातील मजुकारबद्दल नाराजी व्यक्त करण्याऱ्या जयशंकर यांचं मात्र पॉम्पिओ यांनी याच पुस्तकामध्ये तोंडभरुन कौतुक केलं आहे.

पुस्तकात केले अनेक गौप्यस्फोट

पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दावा केला आहे की, सन 2019 मध्ये पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारताने केलेल्या सार्जिकल स्ट्राइकनंतर दोन्ही देश अण्विक युद्धाच्या फार जवळ आले होते. भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीच आपल्याला ही माहिती दिली होती, असंही पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे.

पुस्तकात डोभाल यांचाही उल्लेख

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिल्ल्या माहितीनुसार पॉम्पिओ यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये भारतीय परराष्ट्रमंत्र्यांबरोबरच्या आपल्या संबंधांबद्दल भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोभाल यांचाही उल्लेख केला आहे. पॉम्पिओ यांच्या या पुस्तकामध्ये सुषमा स्वराज यांच्याबद्दल अनेक वादग्रस्त विधानं करण्यात आली आहेत. पॉम्पिओ यांनी या पुस्तकात सुषमा स्वराज या 'गूफबॉल' असं म्हटलं आहे.

सुषमा स्वराज यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

सुषमा स्वराज या मे 2014 ते मे 2019 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये सुषमा स्वराज यांचं आकस्मिक निधन झालं. पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकामध्ये, "भारतीय पक्षासंदर्भात माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या फार महत्त्वपूर्ण नव्हत्या. त्यांच्यापेक्षा मी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याबरोबर चांगलं गाम केलं. ते पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय आहेत आणि अधिक विश्वासार्ह आहेत," असं म्हटलं आहे.

जयशंकर यांनी व्यक्त केला संताप

एस जयशंकर यांनी पॉम्पिओ यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, "मी माझी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्या पुस्तकामधील सुषमा स्वराज यांचा उल्लेख केल्याचा संदर्भ वाचला. मी नेहमीच त्यांचा (सुषमा स्वराज यांचा) सन्मान केला आहे. सुषमा स्वराज यांच्याबरोबर माझे फार घनिष्ठ आणि आपुलकीचे संबंध होते. पॉम्पिओ यांच्या पुस्तकामध्ये माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासाठी वापरण्यात आलेली भाषा ही अपमानास्पद असून मी कठोर शब्दांमध्ये त्याची निंदा करतो," असं म्हटलं आहे.

पॉम्पिओ यांच्याकडून जयशंकर यांचं कौतुक

पॉम्पिओ यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जयशंकर यांचा 'जे' असा उल्लेख केला आहे. "सुब्रह्मण्यम जयशंकर माझ्या मते दुसरे सक्षम भारतीय होते. मे 2019 मध्ये ते भारताचे नवे परराष्ट्रमंत्री झाले तेव्हा मीही त्यांचं स्वागत केले होतं. त्यांच्याहून अधिक सक्षम मंत्री मिळाला नसता. मला या व्यक्तीवबद्दल फार प्रेम आहे. जयशंकर हे इंग्रजीबरोबरच एकूण सात भाषांमध्ये संवाद साधतात. त्यांची भाषा माझ्यापेक्षाही चांगली आहे," असं पॉम्पिओ यांनी जयशंकर यांच्याबद्दल म्हटलं आहे.

पॉम्पिओ आहेत तरी कोण?

59 वर्षीय पॉम्पिओ हे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. पॉम्पिओ यांनी 2017 पासून 2020 पर्यंत ट्रम्प सरकारमध्ये सीआयए निर्देशक आणि 2018 ते 2021 दरम्यान ते परराष्ट्रमंत्री होते. सध्या पॉम्पिओ हे 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीसंदर्भातील तयारी करत आहेत.