महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र; साध्वी प्रज्ञा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपकडून मध्य प्रदेशात गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली होती.

Updated: Oct 21, 2019, 06:10 PM IST
महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र; साध्वी प्रज्ञा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

भोपाळ: महात्मा गांधीजी हे राष्ट्रपुत्र असल्याचे वक्तव्य करून भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपकडून मध्य प्रदेशात गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली होती. मात्र, साध्वी प्रज्ञासिंह या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. याविषयी प्रसारमाध्यमांकडून विचारणा केली असता साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, गांधीजी हे राष्ट्रपुत्र होते. मी त्यांच्या कार्याची प्रशंसा करते. मात्र, संकल्प यात्रेला उपस्थित न राहण्याविषयी मी कोणतेही स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले. 

अखेर नथुराम गोडसेविषयीच्या 'त्या' वक्तव्यानंतर साध्वींना उपरती, म्हणाल्या....

ज्यांनी देशासाठी काम केले आहे असे सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहेत. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर मी कायम चालत राहीन. ज्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचे आपण निश्चितच आभार मानायला हवेत, असेही साध्वी यांनी सांगितले. मात्र, यावेळी साध्वी यांनी 'राष्ट्रपिता' असे संबोधल्या जाणाऱ्या महात्मा गांधीजी यांचा 'राष्ट्रपुत्र' असा केलेला उल्लेख अनेकांना खटकला आहे. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या काळात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी सांगितले होते. यावरून बराच वादंग झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण या वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कदापि माफ करणार नाही, असे म्हटले होते.