भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या स्पोर्टस् अकादमीमध्ये एका अवघ्या १९ वर्षीय महिला खेळाडूनं एका बाळाला जन्म दिलाय. ही महिला खेळाडू सहा महिन्यांची गर्भवती होती. परंतु, याची भनकही स्पोर्टस् अकादमीला किंवा हॉस्टेलला नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी प्रॅक्टीस करताना तरुणीनं पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हॉस्टेलची एका वॉर्डननं तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. इथं सोनोग्राफी केल्यानंतर तरुणी गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. प्रीमॅच्युअर अर्भक (सहा महिने) जन्माला आल्यानं अद्याप त्याच्यावरदेखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
ही १९ वर्षीय तरुणी सेलिंग अकादमीमध्ये कयाकिंगचं प्रशिक्षण घेत होती. ती मूळची कटनीची रहिवासी आहे. या तरुणीच्या आई-वडिलांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर ती कटनीच्या अनाथआश्रमात राहत होती. त्यानंतर तरुणीनं भोपाळच्या सेलिंग अकादमीत प्रवेश घेतला होता. भोपाळच्या टी टी नगर स्टेडियममध्ये वॉटर स्पोर्टस अकादमीच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. रुग्णालयानं यासंदर्भात तरुणीच्या आजी-आजोबांना माहिती दिलीय. रुग्णालयातून सोडल्यानंतर तिला आजी-आजोबांसोबत पाठवण्यात येणार आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच खेळ विभागाचे प्रमुख सचिव अनिरुद्ध मुखर्जी यांनी विभागीय खेळाडूंना फटकारलंय. महिला खेळाडू सहा महिन्यांची गर्भवती असताना याची भनकही कुणाला लागली नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. प्रमुख सचिवांनी खेळाडूच्या कोचसहीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण उघड झाल्यानंतर महिला खेळाडुंच्या सुरक्षेचा प्रश्न ढळढळीतपणे समोर आलाय.