काँग्रेसकडून शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदल; सावरकरांची 'वीर' उपाधी हटवली

सावरकरांनी ब्रिटिशांना तब्बल चार दया याचिका पाठवल्या. 

Updated: Jun 14, 2019, 01:13 PM IST
काँग्रेसकडून शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदल; सावरकरांची 'वीर' उपाधी हटवली title=

जयपूर: राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर गेहलोत सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींसंदर्भातील तपशीलाचा समावेश आहे. भाजपची सत्ता असताना पाठ्यपुस्तकात जाणीवपूर्वक काही बदल करण्यात आले होते. या सुधारणा रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला. 

त्यानुसार स्वातंत्र्यलढ्याची माहिती असलेल्या धड्यामध्ये सावरकरांच्या नावामागील 'वीर' ही उपाधी हटवण्यात आली आहे. या धड्यात सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी माहिती देण्यात आली होती. मात्र, सुधारित आवृत्तीनुसार सावकरांचा उल्लेख थेट विनायक दामोदर सावरकर असा करण्यात आलाय. अंदमानच्या तुरुंगात असताना ब्रिटिशांच्या छळाला सावरकर घाबरले होते, असा उल्लेखही या धड्यात आहे. १४ नोव्हेंबर १९११ रोजी ब्रिटीश सरकारला पाठवलेल्या विनंती पत्रात सावरकर यांनी स्वत:ला 'सन ऑफ पोर्तुगाल' म्हणवून घेतले होते. त्यांनी ब्रिटिशांना तब्बल चार दया याचिका पाठवल्या. 

तसेच सावकरांना भारताला हिंदू राष्ट्र करायचे होते. त्यांनी १९४२ सालच्या 'भारत छोडो चळवळ' आणि पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध केला होता. तसेच महात्मा गांधीजी यांची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला मदत केली होती. मात्र, या आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली, असा उल्लेख या धड्यामध्ये आहे. 

राजस्थान सरकारने १३ फेब्रुवारी रोजी पाठ्यपुस्तकांतील राजकीय हेतून प्रेरित असलेला आणि इतिहासाची मोडतोड करणाऱ्या मजकुराचे परीक्षण करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीच्या सुचनांनुसार पाठ्यपुस्तकात हे बदल करण्यात आले. यामध्ये महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यातील हळदीघाटची लढाई, अलाउद्दीन खिलजी , मोदी सरकारचा निश्चलनीकरणाचा निर्णय, देशातील मुस्लिम संघटना, जिहाद यासंदर्भातील तपशीलांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.