अरुणाचलमध्ये वायुसेनेचं एएन ३२ विमान दोन दिवसानंतरही बेपत्ताच, शोध सुरू

वायुसेना, आयटीबीपी आणि सेनेनंतर आता या विमानाच्या शोधासाठी नौसेनंही कंबर कसलीय

Updated: Jun 5, 2019, 11:03 AM IST
अरुणाचलमध्ये वायुसेनेचं एएन ३२ विमान दोन दिवसानंतरही बेपत्ताच, शोध सुरू  title=

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या बेपत्ता झालेल्या एएन - ३२ विमानाचा दोन दिवस उलटून गेले तरी शोध लागलेला नाही. सोमवारी दुपारी १२.२५ वाजता आसामच्या जोरहाटमधून उड्डाण घेतलं. जोरहाटवरून हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेन्चुका गावातील 'एडव्हान्स लॅन्डिंग ग्राऊंड'वर उतरणं अपेक्षित होतं. परंतु, उड्डाणानंतर मेन्चुकाजवळच्याच पेयुम भागात या विमानाचा संपर्क तुटला होता. गाऊंड कंट्रोल अधिकाऱ्यांशी या विमानाचा शेवटचा संपर्क दुपारी १ वाजता झाला होता. वायुसेना, आयटीबीपी आणि सेनेनंतर आता या विमानाच्या शोधासाठी नौसेनंही कंबर कसलीय. 

विमानाच्या शोधासाठी आता नौदलाच्या लांब पल्ल्यावरून शोध घेऊ शकणाऱ्या 'पी ८ आय' या विमानाची मदत घेण्यात येतेय. या विमानानं मंगळवारी तमिळनाडूच्या आराकोणमहून अरुणाचल प्रदेशसाठी उड्डाण घेतलं. दुसरीकडे, भारतीय वायुसेनेचं सुखोई-३० हे लढावू विमान तसंच सी-१३० स्पेशल ऑपरेशनल एअरक्राफ्टही या विमानाच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे. अरुणाचल प्रदेशमधल्या मेन्चुका इथल्या घनदाट जंगलात विमान कोसळलं असावं, असा अंदाज आहे. विमानात ८ कर्मचाऱ्यांसह एकूण १३ जण होते.

भारतीय वायुसेनेचं एएन - ३२ हे रशियन बनावटीचं विमान आहे. यापूर्वी जून २००९ मध्ये अरुणाचल प्रदेशातील वेस्ट सियांग प्रांतातील एका गावानजिक एएन-३२ विमान दुर्घटनेला बळी पडलं होतं. या दुर्घटनेतही १३ जणांनी आपला जीव गमावला होता. तसंच जुलै २०१६ मध्येही एका एएन-३२ विमानानं चेन्नईच्या पोर्ट ब्लेअरहून उड्डाण घेतलं... मात्र रस्त्यातच हेही विमान बेपत्ता झालं होतं. या विमानातून २९ जण प्रवास करत होते. या विमानाचा शोध काही महिने सुरू होता परंतु, अद्याप या विमानाचा आणि त्यातील प्रवाशांचा शोध लागलेला नाही.