#SeemanchalExpress : 'डोळे उघडले तर बहिणीचा पाय कापला होता'

दुर्घटनावेळी आम्ही गाढ झोपेत होतो

Updated: Feb 3, 2019, 01:43 PM IST
#SeemanchalExpress : 'डोळे उघडले तर बहिणीचा पाय कापला होता' title=

नवी दिल्ली : बिहारच्या हाजीपूरजवळ सहदाई बुजुर्ग रेल्वे स्थानकाजवळ सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डब्बे रूळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर २७ प्रवासी जखमी झाली. सकाळी ३ वाजून ५२ मिनिटांनी झालेल्या अपघातावेळी ट्रेनमधील प्रवासी झोपेत होते. त्याचवेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबालाही या अपघाताचा जबर धक्का बसला आहे. या कुटुंबातील एका महिलेचा दुर्घटनेत पाय कापला गेला. दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाने त्यांची कहाणी सांगितली. 

दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाची कैफियत

दुर्घटनाग्रस्त सविता यांचे कुटुंब बंगाल सीमेलगत असणाऱ्या रायगढ येथून दिल्ली जाण्यासाठी सविता यांचे कुटुंब सीमांचल एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. पहाटेची वेळ असल्याने सर्वजण गाढ झोपेत होते. त्याचवेळी काही समजण्याच्या आत मोठा आवाज झाला. झोपेतून डोळे उघडून पाहिलं तर सर्वजण एकमेकांवर पडत होते. आम्ही यातून वाचलो परंतु माझ्या बहिणीचा पाय कापला गेला. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी कोणालाही काही समजत नव्हते. 

घटनास्थळी दाखल झालेल्या बचावपथकांकडून रेल्वेखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेल्या जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये तर गंभीररित्या जखमी झालेल्यांना १ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. किरकोळ जखमींना ५० हजार रूपयांची मदतही रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.