नवी दिल्ली: उर्जित पटेल यांनी सोमवारी तडकाफडकी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय व आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पटेल यांनी आपण वैयक्तिक कारणासाठी या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. मात्र, या सगळ्याला गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेले वाद कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नेमणूक करणार, याविषयीच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उर्जित पटेल यांच्यानंतर गव्हर्नरपदासाठी निवृत्त केंद्रीय महसूल सचिव शक्तिकांत दास आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन ही दोन नावे आघाडीवर आहेत. यापैकी शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जायचे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात दास यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आगामी निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारकडून लोकप्रिय आर्थिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी विश्वासातील व्यक्ती गव्हर्नरपदी असणे, भाजपसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे शक्तिकांत दास यांच्याकडे गर्व्हनरपदाची सूत्रे जाण्याची दाट शक्यता आहे.
आम्हाला उर्जित पटेलांची खूप मोठी उणीव जाणवेल- मोदी
याशिवाय, रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन हेदेखील या शर्यतीत असल्याचे सांगितले जाते. याबाबत अजूनपर्यंत कोणताही ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी तुर्तास हे दोघेजण गव्हर्नरपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
मोदींनी उर्जित पटेलांना थांबवावे, अन्यथा अर्थव्यवस्थेला फटका बसेल- स्वामी
उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होते. रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये पटेल यांच्याकडे तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता.